‘शाहू’ ठरला देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना! सलग दुस-यांदा मारली बाजी | पुढारी

‘शाहू’ ठरला देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना! सलग दुस-यांदा मारली बाजी

कागल(कोल्‍हापूर), पुढारी वृत्तसेवा : देशातील सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज नवी दिल्ली यांचा वसंतदादा पाटील यांच्या नावाने दिला जाणारा देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना” हा मानाचा पुरस्कार हंगाम 2021-22 दिला जातो. हा पुरस्‍कार श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास मिळाला आहे. हंगाम 2018-19 मध्ये ‘शाहू’ या पुरस्काराचा मानकरी ठरला होता.

शाहू साखर कारखान्यास राष्ट्रीय व राज्यपातळीवर आजअखेर एकूण ६६ पुरस्कार मिळाले आहेत.यामध्ये ६ पुरस्कार देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून आहेत.या ६६ व्या पुरस्कारामुळे कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. हा पुरस्कार नवी दिल्ली येथे समारंभपुर्वक कारखान्यास प्रदान करण्यात येणार आहे.

दिल्ली येथील राष्ट्रीय साखर महासंघाचे पुरस्कार मिळाल्याचे पत्र प्राप्त होताच संचालक, सभासद शेतकरी,अधिकारी-कर्मचारी, व हितचिंतक यांनी गैबी चौक,खर्डेकर चौक, श्रीराम मंदिर,कारखाना कार्यस्थळावर तसेच गावोगावी फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला.

कारखाना प्रांगणातील आराध्य दैवत राजर्षी छत्रपती शाहू महाराज, कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.

हेही वाचा

Back to top button