पुणे: लंम्पी रोगावरील लस खरेदीचा मार्ग मोकळा, जिल्हा नियोजन समितीकडून 50 लाखाचा निधी | पुढारी

पुणे: लंम्पी रोगावरील लस खरेदीचा मार्ग मोकळा, जिल्हा नियोजन समितीकडून 50 लाखाचा निधी

पुणे, पुढारी वृत्तेसवा: जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून औषधे व लस खरेदीसाठी प्रत्येकी 25 लाख याप्रमाणे 50 लाखाच्या खर्चास जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ.राजेश देशमुख यांनी मान्यता दिली आहे. लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पुणे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी निधीची मागणी केली होती. आता यामुळे लस खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे.

लंम्पी रोगावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणावर भर देण्यात आला आहे. लंम्पी रोगाचा संसर्ग झालेल्या पशुधनाला इतर जनावरांपासून वेगळे ठेवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. या उपचारासाठी पुरेशी औषधे आणि लस मात्रादेखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यादृष्टीने जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या खर्चास तातडीने मान्यता दिली आहे. लंम्पी नियंत्रणासाठी आवश्यकता असल्यास अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. केंद्र किंवा राज्य शासनाकडून लंम्पी आजारावरील लसीसाठी निधी उपलब्ध झाल्यास हा निधी प्राधान्याने औषधांसाठी वापरण्यात यावा, असेही मंजुरी आदेशात नमूद केले आहे.

जिल्ह्यात लसीकरणाला वेग

जिल्ह्यात 12 तालुक्यातील 76 ठिकाणी पशुधनाला लंम्पीचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. 306 जनावरांना लंम्पीचा संसर्ग झाला असून त्यापैकी 8 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर 177 सक्रिय असून 121 बरे झाले आहेत. हा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी आणि बाधित जनावरांवर औषधोपचार करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी क्षेत्रीय अधिकार्‍यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. त्यासाठी 2 लाख 85 हजार 700 लसमात्रा उपलब्ध झाल्या आहेत. .

जिल्ह्यात 290 पथके नेमले

बाधित जनावरे आढळलेल्या गोठ्यापासून 5 किलोमीटर परिसरातील सर्व पशुधनाचे तातडीने लसीकरण करण्याचे निर्देशही अधिकार्‍यांना देण्यात आले असून, त्यानुसार मोहीम स्तरावर हे काम करण्यात येत आहे. निगराणी क्षेत्रातील सुमारे 4 लाख 40 जनावरांचे लसीकरण करावयाचे असून, त्यापैकी 1 लाख 55 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. बाधित जनावरे आढळलेल्या भागापासून 5 किलोमीटरच्या क्षेत्रातील सर्व पशुधनावर मोफत औषधोपचार केले जाणार आहेत. लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभागाची एकूण 290 पथके नेमण्यात आले असून, त्यासाठी 730 अधिकारी-कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रिंग व्हॅक्सिनेशन

लंम्पी संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी वापरण्यात येणार्‍या लसीकरण पद्धतीला ‘रिंग व्हॅक्सिनेशन’असे म्हणतात. यात बाधित जनावराचे ठिकाण किंवा गोठा केंद्र मानून 5 किलोमीटरच्या परिघाच्या भागातील लसीकरण आधी करण्यात येते आणि तेथून सुरुवात करीत बाधित भागाकडे जात जनावरांचे लसीकरण करण्यात येते. त्यामुळे संसर्गाची तीव्रता कमी करण्यास मदत होते.

– डॉ.शितलकुमार मुकणे, पशुसंवर्धन उपायुक्त पुणे.

Back to top button