शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केंद्राचे विशेष लक्ष, केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांचे प्रतिपादन | पुढारी

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केंद्राचे विशेष लक्ष, केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांचे प्रतिपादन

नारायणगाव, पुढारी वृत्तसेवा: सन २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने किसान सन्मान योजना, आयुष्यमान कार्ड, उज्वला गॅस, स्वच्छता अभियान, बेटी बचाव बेटी पढाव सारख्या अनेक योजना राबवून खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. भारत देश हा आर्थिकदृष्ट्या जागतिक पातळीवर ५ व्या क्रमांकावर आहे. भारत कृषीप्रधान देश आहे आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष घालत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी केले.

लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून शिरूर लोकसभेमधील नागरिकांच्या समस्या, अडचणी, प्रलंबित कामे यांचा मी आढावा घेतला आहे. हे सर्व प्रश्न मी प्रामाणिकपणे दिल्ली दरबारी मांडून लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या दिवसात शिरूर लोकसभेच्या सर्वांगीण विकासासाठी कमळ फुलवणे गरजेचे असल्याचे केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी केले.

लोकसभा प्रवास योजने अंतर्गत नारायणगाव येथे गुरुवारी (दि. १५) आयोजित सभेत रेणुका सिंह बोलत होत्या. यावेळी शिरूर प्रभारी आमदार माधुरी मिसाळ, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा संघटक धर्मेंद्र खांडरे, माजी आमदार योगेश टिळेकर, माजी जिल्हा परिषद सदस्या वंदना कोदरे, शरद बुट्टे पाटील, तालुकाध्यक्ष संतोष तांबे, एकनाथ पवार, पंचायत समिती सदस्या अर्चना माळवदकर, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोषनाना खैरे, नामदेव खैरे, आशिष माळवदकर, भगवान घोलप, वारूळवाडीचे उपसरपंच माया डोंगरे, अक्षय खैरे, भाग्यश्री काळे व भाजपचे तालुक्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या व आदिवासी समाजाचे क्रांती पुरुष बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर महिला लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते रेणुका सिंह यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना रेणुका सिंह म्हणाल्या, मला या ठिकाणी शिरूर लोकसभेमधील समस्या जाणून घेण्यासाठी पाठवले आहे. आमदार, खासदार, सरपंच, सदस्यांनी प्रत्येक गाव, गल्लीतील मतदारांचे असणारे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांची यादी करून ती समजून घेऊन लोकांपर्यंत पोहोचविल्या पाहिजेत, असे सांगितले. यामध्ये आदिवासी बांधवांसाठीच्या योजना, त्याचप्रमाणे विधवा भगिनींसाठीच्या योजना यावर विशेष लक्ष घालणे गरजेचे असल्याचे मत रेणुका सिंह यांनी मांडले. जुन्नर तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी महत्त्वाचा असणारा असणारा हिरडा कारखाना तसेच शेतकऱ्यांच्या कांदा निर्मितीचा याविषयी त्या कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्याशी चर्चा करून सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक आशिष माळवदकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार संतोषनाना खैरे यांनी मानले.

खा. कोल्हे यांना उपरोधिक टोला

जुन्नरहून नारायणगावच्या दिशेने येत असताना रेणुका सिंह यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या कोल्हे मळा येथील कार्यालयापासून जाणारा रस्ता न झाल्याचे पाहत ज्यांना आपल्या कार्यालयाजवळचा रस्ता करता आला नाही, ते काय शिरूर लोकसभेचा विकास करणार असा उपरोधिक टोला खासदार कोल्हे यांना लावला.

Back to top button