कोल्हापूर : बुबनाळात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श, मुस्लिम तरुण बनला गणेश मंडळाचा अध्यक्ष | पुढारी

कोल्हापूर : बुबनाळात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श, मुस्लिम तरुण बनला गणेश मंडळाचा अध्यक्ष

कवठेगुलंद (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात मशिदीच्या भोंग्यावरून गेली काही महिने धार्मिक वातावरण तापले होते. राज्यात ठिकठिकाणी बंधने घालण्यात आली होती. मात्र बुबनाळ (ता. शिरोळ) गावातील श्रीमंत सिद्धिविनायक मंडळाने हिंदू मुस्लिम ऐक्याचा आदर्श समाजासमोर घालून दिला आहे. तसेच बुबनाळमधील फ्रेंड्स सर्कल मंडळाच्या श्रीची मूर्तीदेखील सीमेवर रक्षण करणाऱ्या मुस्लिम समाजातील सिराज बैरागदार या सैनिकाने दिलीय. बुबनाळ गावातील या दोन मंडळाने सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

बुबनाळ मेन रोडवरील सिद्धिविनायक मंडळ गेली १३ वर्षे पासून गणेशोत्सव साजरा करीत आहे. या परिसरात भुसारी परिवार राहतो त्याच घरातील तरुण म्हणजेच असिफ भुसारी. त्याची गणपतीवर विशेष श्रद्धा आहे. मुस्लिम समाजातील असूनही असिफ भुसारी या तरुणाला लहानपणापासूनच गणपती उत्सवाची व हिंदू सणाची आवड आहे. त्यामुळे तो या उत्सवात अगदी मनापासून सहभागी होत असे या भागात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. पण मागच्या दोन वर्षात मंडळातील काही मतभेद आणि कोरोना संकट यामुळे गणेशोत्सव साजरा करायचा की नाही अशी परिस्थिती होती. असिफ भुसारी याने कोणतेही भेदभाव न पाहता स्वतःहून पुढे येऊन श्रीमंत सिद्धिविनायक मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन दरवर्षीप्रमाणे उत्साहात गणेशोत्सव साजरा करायचा असा निर्धार केला.

या मुस्लिम तरुणाची भक्ती आणि समाजात एकोपा राखण्याची तळमळ पाहून सर्व मंडळातील कार्यकर्ते पुढे आले. त्यांनी असिफ भुसारी यांच्या गळ्यात श्रीमंत सिद्धिविनायक मंडळाच्या अध्यक्षपदाची माळ घातली. गणपतीच्या आगमनापासून ते दररोजच्या आरती महाप्रसाद याची सर्व नियोजन जबाबदारीने कार्य हा अध्यक्ष करीत आहे . त्याला मंडळातील सहकारी अमोल राजमाने, निलेश राजमाने, स्वप्नील शहापुरे, विजय शहापुरे, प्रवीण शहापुरे, बंडू तोरसे, बंडू शहापुरे मंडळातील सर्व कार्यकर्ते उत्तम साथ देत आहेत. बुबनाळातील हिंदू-मुस्लीम समाजाचे ऐक्य समाजासमोर आदर्श निर्माण करत आहे.

Back to top button