सांगली : साक्षर जिल्हा बहुमान दूरच! | पुढारी

सांगली : साक्षर जिल्हा बहुमान दूरच!

सांगली; विवेक दाभोळे :  “विद्ये विना मती गेली…मती विना गती गेली… ”…क्रांतीबा जोतीबा फुले यांच्या या पंक्‍ती तत्कालीन कालासाठीच नव्हेतर आजदेखील तंतोतंत लागू पडतात..! आज जरी सांगली जिल्ह्याची विविध क्षेत्रात प्रगतीत चौफेर आघाडी असली तरी संपूर्ण साक्षर हा बहुमान अद्यापही जिल्ह्यास मिळू शकला नाही. जिल्ह्यातील 81.48 टक्के लोकसंख्या साक्षर आहे. अजून 18.52 टक्के लोकसंख्या निरक्षर आहे. गुरुवारी होत असलेल्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त हे कटू सत्य समोर आले आहे.

सन 1965-66 पासून जिल्हा साक्षरतेत राज्यात आघाडीवर आहे. दि. 8 सप्टेंबर 1965 रोजी तेहरान येथे जगभरातील शिक्षणमंत्र्यांची एक परिषद झाली. यात साक्षरतेसाठी विविध विषयांवर चर्चा झाली. यानंतर युनेस्कोने दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिन साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून दरवर्षी 8 सप्टेंबररोजी जागतिक साक्षरतादिन होतो.

यासाठी होतो साक्षरता दिन..!

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट वैयक्तिक, सामुदायिक, सामाजिकदृष्ट्या साक्षरतेचे महत्त्व लोकांना पटवून देणे व लोकांना शिक्षणाबद्दल जागरूक करणे हे आहे.

देशाचे चित्र..!

सन 2011 मध्ये देशाचा साक्षरता दर 74.4 टक्के होता. सन 1947 मध्ये हाच आकडा केवळ 18 टक्के होता. केरळ हे देशातील सर्वाधिक साक्षरतेचे राज्य आहे. येथे 93 टक्के लोकसंख्या साक्षर आहे. सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य बिहार आहे. (साक्षरतेचे प्रमाण 63.82 टक्के). देशातील पाच कमी साक्षर राज्यांच्या श्रेणीत उत्तर प्रदेश आघाडीवर आहे.

संपूर्ण साक्षरतेचे आव्हान..!

सांगली जिल्ह्यात सन 2011 च्या जनगणनेनुसार साक्षरतेचे प्रमाण 81.48 टक्के आहे. सन 2001 मध्ये हाच आकडा 76.62 टक्के होता. जिल्ह्यात एकूणपैकी 20 लाख 49 हजार 467 लोकसंख्या साक्षर आहे. यात पुरूषांचे प्रमाण 88.52 टक्के (लोकसंख्या 11 लाख 21 हजार 550) तर साक्षर महिलांची संख्या 9 लाख 27 हजार 7917 (टक्केवारी 74.59 टक्के) आहे. जिल्ह्यात शून्य ते सहा वयोगटांत साक्षरतेचे प्रमाण 10.87 टक्के राहिले आहे. यात मुलांमध्ये 11.45 टक्के तर मुलींमध्ये 10.27 टक्के साक्षरतेचे प्रमाण आहे.

पलूस, वाळवा तालुके अग्रस्थानी

सन 2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील पलूस, वाळवा तालुके साक्षरतेत आघाडीवर आहेत. पलूस तालुक्यात साक्षरतेचे प्रमाण 86.1 तर वाळवा तालुक्यात साक्षरतेचा टक्का 85.2 टक्के आहे. जत तालुक्यात मात्र साक्षरतेचे प्रमाण 70.4 टक्के इतके कमी आहे. आटपाडी तालुक्यात हाच आकडा 72.7 टक्के आहे. तालुकानिहाय साक्षरतेचे एकूण प्रमाण, तसेच तालुकानिहाय ग्रामीण, नागरी लोकसंख्येतील साक्षरतेची टक्केवारी सोबतच्या चौकटीत दिली आहे. दरम्यान, संपूर्ण जिल्हा साक्षर होण्यासाठी प्रशासन, जबाबदार लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित उठाव आणि पाठपुरावा होत नसल्याचे खेदजनक चित्र यानिमित्ताने अधिकच गडद झाले आहे. खरे तर हाच आजच्या साक्षरता दिनाचा सांगावा ठरावा..!

 

Back to top button