

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेले शिल्प महापालिकेने चौकाचौकांत उभारले आहेत. त्या शिल्पाभोवती सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यासाठी निव्वळ सल्ला देण्यासाठी आर्कीटेक्ट नेमला आहे. एका शिल्पाच्या सल्ल्यासाठी तब्बल 60 हजार या प्रमाणे एकूण 9 लाख रूपये शुल्क पालिका देणार आहे. त्यामुळे टाकाऊतून तयार केलेले हे शिल्प महाग ठरत आहेत.
टाकाऊ वस्तूपासून पालिकेने विविध शिल्प तयार करून चौकांत उभारले आहेत.
मोरवाडी चौकात लालघोडा, पिंपळे निलख जंक्शन चौकात बिबट्या, नाशिक फाटा चौकात बैल, कुदळवाडी रोटरी चौकात कार्ट टू कार, केएसबी चौकात डिजिटल बॉक्स, डांगे चौकात फ्लॉवर ऑफ पॅरडाइज, पिंपळे निलख येथे हत्ती, रावेत येथील मुकाई चौकात मावळा, दिघी मॅगझिन चौकात पालखी यात्रा, निगडी भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकात मोर, दुर्गादेवी टेकडीवर खार, पिंपळे सौदागरच्या कोकणे चौकात जीवनचक्र, गुढीपाडवा अशी एकूण 15 शिल्पे बसविण्यात आले आहेत. ते शिल्प तयार करण्यासाठी कलाकारांना लाखांचे मानधन देण्यात आले आहेत. तसेच, त्यांचे निवास, प्रवास व आहारांवरही लाखोंचा खर्च झाला आहे.
आता, या शिल्पांच्या आजूबाजूच्या सुशोभीकरणासाठी शिल्पी आर्किटेक्टस अॅण्ड प्लॅनर्स या आर्किटेक्टची नियुक्ती करण्यात आली आहे. ते शिल्पाचे सुशोभीकरणचा नियोजन करून कामावर देखरेख ठेवतात. त्यासाठी त्यांना एका शिल्पासाठी 60 हजार रूपये शुल्क दिले जात आहे. शहरातील एकूण 15 शिल्पांच्या सुशोभीकरणाच्या सल्ल्यासाठी तब्बल 9 लाख रुपये खर्च पालिका करीत आहे. सुशोभीकरणासाठी स्थापत्य व विद्युतविषयक खर्चही पालिकाचा करणार आहे. त्यामुळे टाकाऊतून तयार केलेल्या शिल्पांचा खर्च वाढतच आहे.
झाकलेल्या शिल्पांमुळे चौकांचे विद्रुपीकरण
शहरातील विविध चौकांत घाई गडबडीत उभारलेल्या या 15 शिल्पांचे अनावरण तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 11 जून 2022 ला करण्यात येणार होते. मात्र, तो दौरा अचानक रद्द झाला. त्यानंतर काही दिवसांनी राज्यात सत्ताबदल झाला. त्यामुळे ती सर्व शिल्पे तब्बल 3 महिन्यांपासून कापड्यात झाकून ठेवण्यात आली आहेत. परिणामी, त्या शिल्पांमुळे चौकांचे विद्रुपीकरण होत आहे.
सुशोभीकरणासाठी आर्किटेक्टची नियुक्ती
नियुक्त केलेले आर्किटेक्ट हे शिल्पांभोवती सुशोभीकरण कसे करावे. त्याचे नियोजन करणे, कामावर देखरेख करणे अशी कामे करत आहे. त्यासाठी ठरलेल्या दरानुसार त्यांना शुल्क देण्यात येत आहेत, असे प्रकल्प विभागाचे प्रमुख कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे यांनी सांगितले.