

नगर : पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव, नवरात्रौत्सव निर्वघ्न पार पाडण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या नेतृत्तवात 'नगर पोलिस दल' सज्ज झाले असून गेल्या नऊ दिवसांत पोलिसांनी तब्बल चार हजारांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. पोलिस 'अॅक्शन मोडवर' आल्याने गुन्हेगारांच्या उरात चांगलीच धडकी भरली आहे. यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे. जिल्ह्यात एक हजार 399 गणेश मंडळांनी पोलिसांकडून परवानगी घेतली आहे.
गणेशोत्सवाला 31 ऑगस्टपासून सुरूवात झाली असली तरी, समाजकंटकांना पायबंद करण्याचे काम पोलिसांनी 25 ऑगस्ट पासूनच हाती घेतले आहे. जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी साडेचार हजार पोलिसांच्या फौजफाट्यासह तगडा बंदोबस्त 'गणेशोत्सव' काळात राहणार आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर तब्बल साडेचार हजारांवर कारवाया पोलिसांनी केल्या आहेत.
सीआरपीसी 107 नुसार 501, सीआरपीसी 109 नुसार 1, सीआरपीसी 110 नुसार 84, सीआरपीसी 144 (2) नुसार 363, सीआरपीसी 149 नुसार 1 हजार 255, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 93, 55, 56 नुसार 82, पाहिजे आरोपी अटक 3, फरार आरोपी अटक 1 अशा दोन हजार 290 कारवाया करण्यात आल्या आहेत. तर एक हजार 558 जणांना समन्स बजावण्यात आले आहेत. तसेच 114 आरोपींना वॉरंट, 319 आरोपींना जामीनपात्र वॉरंट, 322 आरोपींना अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहेत.
विशेष पथके नेमा; एसपींचे आदेश
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी गणेशोत्सव व आगामी सणांच्या पार्श्वभूमिवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यासाठी विशेष पथके नेमण्याचे आदेश दिले असल्याचे जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी 'पुढारी'शी बोलतांना सांगितले.
अनेकांनी हलविले बस्तान
समाजविघातक कृत्य करणारे समाजकंटक, सराईत व पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिस 'अॅक्शन मोडवर' आल्याने अनेक गुन्हेगारांनी आपले बस्तान जिल्ह्यातून हलविल्याचे माहिती सूत्रांनी दिली.
250 जणांना हद्दपारीच्या नोटिसा
सर्व पोलिस ठाण्यांअंतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींवर कारवाई करण्यात येत आहे. नगर शहराअंतर्गत कोतवाली, तोफखाना, भिंगार नगर तालुका व एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतील 250 जणांना हद्दपारीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.