

नगर : पुढारी वृत्तसेवा : लंपीसारख्या रोगाने बाधित जनावरांची शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याला माहिती दिली नाही, या कारणावरून खासगी पशुसेवक प्रदीप झोडगे, चव्हाण आणि दीपक डांगे (सर्व रा. कोर्हाळे, ता. राहाता) यांना पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनीत तुंबारे व पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय कुमकर यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, लंपीबाबत शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याला माहिती न कळविणारे अन्य काही खासगी पशुसेवकही आता प्रशासनाच्या रडारवर आल्याचे समजते. कोर्हाळे येथे प्रदीप झोडगे, चव्हाण व दीपक डांगे हे खाजगी पशुवैद्यकीय सेवा देत आहेत.
संबंधित सेवकांनी लंपी स्कीन डिसीज अथवा अन्य संसर्गजन्य रोगांची घटना आढळल्यास त्वरित नजिकच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यास कळवणे अपेक्षित आहे. मात्र गेले 5 ते 6 दिवस कोर्हाळे हद्दीत शंकर रामभाऊ कणसे, माधव निवृत्ती कणसे, सोमनाथ चांगदेव कालेकर, दौलत तुकाराम कालेकर, ताराबाई गोरक्ष कालेकर, यादव तुकाराम कालेकर यांच्या पशुधनावर या तिघा पशुसेवकांनी उपचार केले. त्यापैकी ताराबाई कालेकर यांची गाय मरण पावली. त्यामुळे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. तुंबारे आणि डॉ. कुमकर यांनी गांभीर्याने दखल घेत खासगी पशुसेवकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
लंपीसारख्या संसर्गजन्य रोगाचे उपचार करताना नजीकच्या शासकीय वैद्यकीय दवाखान्यात कळवणे बंधनकारक होते. ते आपण केलेले नाही, त्यामुळे आपणावर कारवाई का करण्यात येऊ नये, याचा खुलासा 3 दिवसांत करावा, अन्यथा आपणावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पशुसंवर्धन विभागाने केली आहे.