राशिवडे: पुढारी वृत्तसेवा : पुंगाव (ता. राधानगरी) येथील सरपंच संतोष कांबळे यांचा घरफाळा थकीत राहिल्याच्या कारणाने पुणे विभागीय आयुक्तांनी त्यांचे पद अपात्र ठरविले आहे, अशी माहिती जि. प. सदस्य पांडुरंग भांदीगरे, तक्रारदार युवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
येथील लोकनियुक्त सरपंच गणपती पाटोळे यांचे एक वर्षापूर्वी निधन झाले. रिक्त झालेल्या जागी संतोष कांबळे यांची वर्णी लागणार होती. मात्र, कांबळे हे ग्रामपंचायतीचे थकबाकीदार असल्याच्या कारणावरून युवराज पाटील यांनी याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेची मागणी केली होती. त्यानुसार सन २०१९- २० मध्ये कांबळे यांनी घरफाळा भरला नसल्याचे निदर्शनास आणून देत त्यांना अपत्रात ठरविण्यात आले. यानंतर कांबळे यांनी आयुक्तांकडे दाद मागितली.
दरम्यान, खटला व निकालापर्यंतच्या विलंबामुळे कांबळे यांची सरपंचपदी निवड करण्यात आली होती. यानंतर पुन्हा युवराज पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर आयुक्तांनी कांबळे यांच्याकडून १०२ रुपये घरफाळा थकीत असल्याकारणाने त्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे नुकतेच नियुक्त झालेल्या कांबळे यांना सरपंचपद गमवावे लागले आहे. पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत सदस्य सुभाष परीट, अशोक पाटील, पांडुरंग धनवडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अशोक पवार, विजय भांदिगरे, सौरभ कांबळे, शामराव कुलकर्णी आदी उपस्थित होते.
हेही वाचा :