पुणे, पुढारी वृत्तसेवा: ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजय निरुपम यांनी काँग्रेसने आझाद आणि चव्हाण यांना काय दिले नाही ? असा सवाल उपस्थित केला आहे. पक्ष अडचणीत असताना पक्ष सोडणे किंवा नाराजी व्यक्त करून टीका करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.
एका कार्यक्रमासाठी निरुपम शनिवारी पुण्यात आले होते. काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, आझाद गेली 42 वर्षे काँग्रेससोबत आहेत. त्यांना पक्षाने 10 वर्ष लोकसभा, पाच वेळा राज्यसभा दिली. ते इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंहराव, डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. त्यानंतर त्यांना जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री करण्यात आले. त्यांना पक्षाने सर्व काही दिले. त्यांचा 2021 मध्ये राज्यसभेतील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा पक्षाने संधी द्यावी, अशी त्यांची इच्छा होती.
सर्व काही एकाच व्यक्तीला देणे शक्य नसते. आझाद यांना जे मिळाले ते काँग्रेसमुळेच मिळालेे. ज्यांना आजवर काहीच मिळाले नाही, असे कोट्यवधी काँग्रेस कार्यकर्ते आहेत. आज पक्ष ज्या परिस्थितीतून जात आहे. अशा परिस्थितीमध्ये आझाद यांनी निस्वार्थ भावनेने इतर कार्यकर्त्यांसारखे पक्षासोबत उभे राहणे गरजेचे होते. मात्र, ते पक्षाचा राजीनामा देवून कार्यकर्त्यांची दिशा भरकटवण्याचे काम करत आहेत.
आझाद यांनी काँग्रेस सोडल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत टीका केली. आझाद यांच्यानंतर चव्हाण ही काँग्रेस सोडणार का? या प्रश्नावर निरुपम यांनी आजवर काँग्रेस पक्षाने बाबांना काय दिले नाही? असा सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, विधन परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या एका उमेदवाराचा पराभव झाला. त्यानंतर पक्षाने निरीक्षक म्हणून मोहन प्रकाश यांना पाठवले. त्यांनी चौकशी करून पक्ष श्रेष्ठींना अहवालही दिला आहे. पृथ्वीराज बाबांच्या प्रश्नाचे उत्तर लवकरच येईल, मात्र कारवाई होईल की नाही, हे आम्ही सांगू शकत नाही. मात्र काहीना काही कारवाई होईल, असेही निरुपम म्हणाले.