नागपूर : पिवळ्या अन् काळ्या मारबतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी (व्हिडिओ) | पुढारी

नागपूर : पिवळ्या अन् काळ्या मारबतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी (व्हिडिओ)

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळातील दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा नागपुरातील मारबत उत्सव प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी लाखोंची गर्दी रस्त्यांवर पिवळ्या आणि काळ्या मारबतीचे दर्शन घेताना दिसली. भ्रष्टाचारावर, नागपूर महापालिकेच्या भोंगळ कारभारावर तसेच पेट्रोल डिझेलच्या वाढत्या महागाईवर भाष्य करणाऱ्या बडग्यानी यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ईडा पिडा, रोगराई, जादूटोणा, संकटे घेऊन जा गे मारबत… या जयघोषात आज नागपूरची गेले १४१ वर्षांची मारबत उत्सवाची परंपरा पुन्हा एकदा नव्या जोशात पाहायला मिळाली.

कोरोना संकटामुळे मारबतच्या भव्य मिरवणुकीवर मर्यादा आल्या होत्या. मात्र, आज लाखो नागपूरकर कोरोनाचा संकट विसरून मोठ्या उत्साहाने पिवळ्या आणि काळ्या मारबतीच्या दर्शनासाठी घराबाहेर पडले होते. सकाळी ९ वाजता जागनाथ बुधवारी परिसरात पिवळ्या मारबतीची पूजा झाली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही उपस्थित होते.

नागपूरच्या मारबत उत्सवात महती सांगतानाच बावनकुळे यांनी जशी मारबत दरवर्षी नागपूरकरांची ईडा पिडा, रोगराई घेऊन जाते, तशीच महाराष्ट्राची ईडा पिडा नुकत्याच झालेल्या सत्तांतरातून दूर झाली आहे, अशी कोपरखळी मारली. त्यानंतर काही वेळाने नेहरू चौक परिसरात काळ्या मारबतीची पूजा पार पडली. त्यानंतर दोन्ही मारबत आपापल्या मंडपातून बाहेर पडल्या. हजारोंच्या उपस्थितीत दोन्ही मिरवणुका नेहरू पुतळ्याजवळ एकत्रित आल्या. नंतर दोघींच्या एकत्रित मिरवणुकीला सुरुवात झाली.

रस्त्यावर गर्दीच गर्दी

१८८१ पासून १४१ वर्षांची अखंडित परंपरा असलेली ही ऐतिहासिक मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. पिवळ्या आणि काळ्या मारबतीचे दर्शन घेतल्याने सर्व ईडापीडा, रोगराई, दुःख नाहीसे होतात, अशी नागपूरकरांची भावना असल्याने अनेक लोकं आपल्या लहान मुलांना मारबतीच्या प्रतिमेला स्पर्शही घडवतात.

हेही वाचलंत का ? 

Back to top button