कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोव्हिडनंतर दोन वर्षांनी पहिल्यांदाच प्रत्येकजण मोकळा श्वास घेत आहे. भारत व परदेशात जाणार्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यटन व्यवसायातील अडचणी लक्षात घेऊन सुधारणा करण्यास वाव आहे. 'टूर्स अँड ट्रॅव्हल्स'कडे येणारा ग्राहक समाधानी राहिला, तरच पर्यटन क्षेत्राला उज्ज्वल भविष्य आहे. यातूनच रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले.
दै. पुढारी 'टूर्स अँड ट्रॅव्हल्स-2022' प्रदर्शनाचे हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसुदन हॉलमध्ये शनिवारी शानदार उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉॅ. शिर्के बोलत होते. 'गगन टूर्स' प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून सहप्रायोजक 'अ हेवन हॉलीडेज' आहेत. याप्रसंगी दै.'पुढारी'चे कार्यकारी संपादक विजय जाधव, दै. 'पुढारी'चे सरव्यवस्थापक (ऑपरेशन्स) राजेंद्र मांडवकर, 'गगन टूर्स'च्या श्रीमती नंदिनी खुपेरकर, 'अ हेवन हॉलीडेज'च्या सौ. वर्षा बुगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, पर्यटन हे एक वेगळे क्षेत्र आहे. पर्यटन क्षेत्रात चांगली सेवा देणे हे प्रत्येक घटकाचे कर्तव्य आहे. खेड्यापाड्यातील ग्राहक महत्त्वाचा असून तो पर्यटनाकडे कसा आकर्षित होईल, हे पाहणे महत्त्वाचे आहे. पर्यटन क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ, आयसीटी ट्रेनिंग याचा वापर केला जात आहे. विमान नाईट लँडिंग, रेल्वे, रस्त्यांचे जाळे या प्रकारच्या सुविधांमुळे देश-विदेशात पर्यटनास खूप वाव आहे.
कोल्हापूरसह इतर ठिकाणी पर्यटनासाठी काय सुविधा देऊ शकतो, याचा विचार करावा लागणार आहे. पर्यटनास चालना देण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरणार आहेे, असेही ते म्हणाले. कार्यकारी संपादक जाधव म्हणाले, कोरोनानंतर पर्यटनाचे विश्व खुले झाले आहे. जगातील पर्यटनाचा विचार करताना आपल्या येथे काय सेवा देऊ शकतो, याचा स्थानिक पातळीवर विचार व्हायला हवा. विविध सेवांचा विस्तार होत असताना शिवाजी विद्यापीठाने लोकाभिमुख पर्यटन होण्यासाठी पुढाकार घ्यावा. पर्यटनासंदर्भात सर्व्हे करून आराखडा तयार करावा. तो छोटे व्यावसायिक, हॉटेल मालक संघ, पर्यटनाशी संबंधित लोकांना द्यावा. त्यामुळे पर्यटन क्षेत्रात काम करणे सोपे
होईल.
यावेळी अ हेवन हॉलीडेजचे प्रज्ज्वल बुगडे, गगन टूर्सचे योगेश सोनटक्के, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे बळीराम व्हराडे, दै. 'पुढारी'चे विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार, सिनिअर इव्हेंट मॅनेजर राहुल शिंगणापूरकर आदी उपस्थित होते.
दै. पुढारी 'टूर्स अँड ट्रॅव्हल्स-2022'ला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला गर्दी झाली. ट्रॅव्हल्स कंपन्यांनी जाहीर केलेल्या राज्य, देश-विदेशातील पर्यटनाच्या विविध सवलती आणि डिस्काऊंट ऑफरचा लाभ घेण्यासाठी स्टॉलला भेट देऊन ग्राहकांनी माहिती घेतली.
हेही वाचा