कोल्हापूर : पुराच्या पाण्यात पिलांसह २५ माकडे झाडावर अडकले; जीव वाचविण्यासाठी धडपड | पुढारी

कोल्हापूर : पुराच्या पाण्यात पिलांसह २५ माकडे झाडावर अडकले; जीव वाचविण्यासाठी धडपड

पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा : गेले चार दिवस जवळपास २५ माकडे व त्यांची लहान पिलं झाडावरच अडकली आहेत. चारी बाजुला पुराचे पाणी आहे. पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या या माकडांच्या कळपाची जीव वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे.

पन्हाळा वन विभाग व आपत्ती व्यवस्थापन समितीचे कर्मचारी या माकडांचा कळप सुखरूप रहावा म्हणून अहोरात्र त्यांची देखभाल करत आहे. पन्हाळा तालुक्यातील आसूर्ले-दरेवाडी येथे कासारी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठी असणाऱ्या झाडावर २५ माकडे आपल्या पिलांसह पूर ओसरण्याची वाट पहात आहेत. वन विभागाचे पन्हाळा वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मोहिते, वनपाल विजय दाते, वनरक्षक संदीप पाटील व आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी श्री सुनील यांनी या पुरात अडकलेल्या माकडांना रेस्क्यू करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. पण सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले असल्याने आता पूर ओसरण्याची वाट पाहण्याशिवाय अन्य पर्याय नाही.

बोट खाद्यपदार्थ घेऊन झाडाजवळ पोहचली की केविलवाणी माकडांची चेहरे

वनरक्षक संदीप पाटील व गावकरी यांनी या माकडांना दररोज केळी, उसाची कांडे अशी खाण्याची व्यवस्था केली आहे. या खाण्यावरच माकडांची गेले चार दिवस गुजराण सुरू आहे. या माकडांच्या कळपात अनेक लहान पिलं आहेत. बोटीतून हे खाद्यपदार्थ माकडे असणाऱ्या झाडांवर ठेवले जात आहे. बोट खाद्यपदार्थ घेऊन झाडाजवळ पोहचली की केविलवाणी माकडांची चेहरे पाहून गलबलून येते, असे वनरक्षक संदीप पाटील यांनी भावनिक होऊन प्रतिक्रिया दिली. पाणी ओसरत नाही तो पर्यंत या मुक्या जीवांना काहीही कमी पडू देणार नाही. काही झालं तरी माकडांना अन्न मिळाले पाहिजे असा पाटील व वनपाल विजय दाते यांनी ठरवले आहे.

हेही वाचा

Back to top button