कोल्हापूर : नऊ कोटीचा शिरगाव पूल पाण्यात! अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा चव्हाटयावर | पुढारी

कोल्हापूर : नऊ कोटीचा शिरगाव पूल पाण्यात! अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा चव्हाटयावर

कौलव; पुढारी वृत्तसेवा : भोगावती नदीवरील महापूर काळात विस्कळीत होणारी वाहतूक सुरू ठेवण्यासाठी शिरगाव ते आमजाई व्हरवडे दरम्यान नऊ कोटी रुपये खर्चाच्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र भोगावती नदीला पूर येताच हा पूल पाण्याखाली गेला असून अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर आला आहे.

शिरगाव ते आमजाई व्हरवडे दरम्यान भोगावती नदीवर 65 वर्षांपूर्वीचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. मात्र हा बंधारा केवळ सिंचनासाठी असताना त्यावरून वाहतूक सुरू असते त्यामुळे तो खिळखिळा झाला आहे. दरवर्षी महापूर काळात हा बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे भोगावती काठ व तुळशी धामणी खोऱ्याचा संपर्क पूर्णपणे तुटतो. वाहतूक सडोली खालसा राशीवडे अथवा कसबा तारळे मार्गे वळवावी लागते. परिणामी लोकांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते. म्हणून या ठिकाणी वाहतूक पुलाची मागणी सातत्याने होत होती. भाजप शिवसेना सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील व आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी नऊ कोटीच्या पुलाला मंजुरी मिळाली आहे. येथील कामाला 2017 मध्ये सुरुवात झाली मात्र कोरोना व निधीची कमतरता यामुळे काम रखडलेले होते.

सध्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुलाच्या माथ्यावरील स्पॅम जोडलेले असून त्यावरील काँक्रिटीकरणासह दोन्ही बाजूंनी भरावा वाहतुकीचा रस्ता याचे काम शिल्लक आहे. मात्र या पुलाच्या उंचीचा प्रश्न ऐरणीवर आला असून पुलाच्या माथ्याची बाजूच पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा व बोटचेपे धोरण चव्हाट्यावर आले आहे. या पुलाच्या मंजुरी व आराखड्याचे काम मुंबईत झाल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्थानिक अधिकारी हात झटकून रिकामे होत आहेत. मात्र पूर येताच पाण्याखाली गेलेला पूल महापुरादरम्यान वाहतुकीसाठी निरूपयोगी ठरणार आहे. ही बाब पहिल्या वर्षीच अधोरेखित झाली आहे. या पुलाची उंची जुन्या बंधाऱ्यापेक्षा किमान साडेचार मीटरने जास्त असावी अशी मागणी सातत्याने होत होती. मात्र ही उंची केवळ अडीच मीटर असून अधिकाऱ्यांनी या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावले आहेत त्यामुळे तब्बल नऊ कोटी रुपये पाण्यात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे दैनिक पुढारीने यावर वेळोवेळी आवाज उठवला होता. मात्र सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे केलेले दुर्लक्ष भोवले आहे. या पुलावरून दूधगंगा भोगावती तुळशी धामणी खोरा जोडला जातो तसेच गगनबावडा राज्य मार्गही जोडला जातो मात्र हा पूल पाण्याखाली गेल्याने याच्या उंचीबाबत फेरविचार करण्याची गरज निर्माण झाली असून ना. चंद्रकांत पाटील व आ.आबिटकर यांनी पुलाचे काम पूर्ण होण्यापूर्वी उंचीचा तिढा मिटवावा अशी मागणी होत आहे.

हेही वाचा 

Back to top button