कोल्हापूर : खा. मंडलिकांच्या घरावर शिवसेनेचा मोर्चा | पुढारी

कोल्हापूर : खा. मंडलिकांच्या घरावर शिवसेनेचा मोर्चा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या खासदार संजय मंडलिक यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानावर शिवसैनिकांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. इतरांना बेंटेक्स म्हणणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून शिंदे गटात सामील झाले, अशा बेंटेक्स खासदारांचा खरा चेहरा उघड करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याच्या भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या.

सासने ग्राऊंडवरून हातात भगवे ध्वज घेऊन मोर्चा निघाला. यावेळी मंडलिक यांच्या गळ्यात बेंटेक्सची चेन व हातात ब—ेसलेट असणारा फलक लक्षवेधी ठरला. यावेळी खा. मंडलिक राजीनामा द्या, अशा घोषणा देण्यात आल्या. खा. मंडलिक यांच्या रूईकर कॉलनी येथील बंगल्याचे काम सुरू असल्याने ते शिवाजी पार्क येथे राहात आहेत. मोर्चावेळी ते घरात नव्हते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून हा मोर्चा विक्रम हायस्कूल येथे अडविण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केले. या ठिकाणी उभारलेल्या व्यासपीठावरून शिवसेना पदाधिकार्‍यांनी मंडलिकांवर तोफ डागली.

जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, मंडलिक यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे. जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनीही भविष्यात ते निवडणुकीला उभे राहिले तर लाखांच्या फरकाने पराभूत होतील, असे सांगितले. आंदोलनात हर्षल सुर्वे, राजू यादव, विराज पाटील, संभाजी भोकरे, दिनेश परमार, शुभांगी पोवार व शिवसैनिक उपस्थित होते. मोर्चासाठी मोठा पोलिस बंदोबस्त होता.

शिंदे गटात बेंटेक्स कसे गेले?

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत संजय मंडलिक यांनी भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांचा पराभव केला होता. यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही त्यांना साथ मिळाली. सेनेच्या तिकिटावर खासदार झाले आणि सेनेशी गद्दारी केली. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर मंडलिक रस्त्यावर उतरले आणि ‘गेले ते बेंटेक्स आणि राहिले ते सोने’ असे म्हणाले होते. आता हे बेंटेक्स शिंदे गटात कसे काय सामील झाले? असा सवाल जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला.

Back to top button