कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे विभाग विद्युत रोषणाईने उजळले | पुढारी

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे विभाग विद्युत रोषणाईने उजळले

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हर घर तिरंगा उपक्रमास शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील विभागांनी आपापल्या मजल्यावर तिरंगा रंगाची विद्युत रोषणाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील मजले विद्युत रोषणाईने व सजावटीने सजू लागले आहेत. आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांनी प्रथम ही संकल्पना राबविली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येणार्‍या उपक्रमामध्ये ग्रामीण भागातील लोकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे याकरिता जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात सर्व गटविकास अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये ध्वजारोहण करण्यासंबंधी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले आहे. यानिमित्ताने सर्व आरोग्य केंद्रांत आरोग्यासंदर्भातील प्रचार व प्रसाराचे फलक लावावेत. हर घर झेंडा कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियोजनपूर्वक कार्यक्रमाची आखणी करावी, असे सांगण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेच्या आवारात तिरंगा ध्वज वितरित करण्यासाठी बचत गटांच्या वतीने मांडण्यात आलेल्या स्टॉलला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दुपारनंतर नागरिकांना तिरंगा उपलब्ध होऊ शकला नाही. जिल्हा परिषदेच्या विभागांनी सायंकाळपासून आपापले विभाग सजविण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य विभागाने दुसर्‍या मजल्याची साफसफाई करून आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. याठिकाणी आदर्श आरोग्यदायी गाव संकल्पना साकारण्यात आली आहे. त्यालाही विद्युत रोषणाई केली आहे. ग्रामपंचायत विभागाने पहिल्या मजल्याच्या सुुशोभीकरणास सुरुवात केली आहे.

Back to top button