kolhapur rain update : पंचगंगेची पाणीपातळी ३७ फुटांवर ; ७१ बंधारे पाण्याखाली | पुढारी

kolhapur rain update : पंचगंगेची पाणीपातळी ३७ फुटांवर ; ७१ बंधारे पाण्याखाली

पुढारी ऑनलाईन डेस्क : जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. जोरदार पाऊस सुरू असल्याने पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आज दुपारी १ वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी ३७ फूट ७ इंच एवढी झाली असून, इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फूट आहे. नदीवरील एकूण ७१ बंधारे पाण्याखाली आहेत, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात 225.58 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी सात वाजताच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज रात्रीपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 225.58 दलघमी, तुळशी 84.96 दलघमी, वारणा 851.88 दलघमी, दूधगंगा 584.51 दलघमी, कासारी 66.46 दलघमी, कडवी 70.30 दलघमी, कुंभी 66.62 दलघमी, पाटगाव 92.46 दलघमी, चिकोत्रा 38.71 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, आंबेआहोळ 30.98 जंगमहट्टी, जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून चित्री मध्यम प्रकल्प आज पहाटे पाच वाजता पूर्ण क्षमतेने भरला.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 36.6 फूट, सुर्वे 34.10 फूट, रुई 64.2 फूट, इचलकरंजी 59 फूट, तेरवाड 50 फूट, शिरोळ 42 फूट, नृसिंहवाडी 39 फूट, राजापूर 29.11 फूट तर नजीकच्या सांगली  14 फूट व अंकली 18.8 फूट अशी आहे.

जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्‍यास डोंगराळ भागात भूस्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना तत्काळ पूर येणे अथवा गावठाणातील जुन्या धोकादायक घरांची पडझड अशा घटना घडण्याची शक्यता असते. यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा, असे आवाहनही करण्‍यात आली आहे.

हेही वाचा

Back to top button