हज यात्रेसाठी पायी निघाला केरळचा तरुण; ८५०० किमीचा प्रवास, पाच देशांच्या सीमा पार करणार

हज यात्रेसाठी पायी निघाला केरळचा तरुण; ८५०० किमीचा प्रवास, पाच देशांच्या सीमा पार करणार

हुपरी; अमजद नदाफ : सध्या जगभरात मुस्लिमांचे पवित्र स्थान असलेल्या हजची यात्रा सुरू आहे. त्यासाठी देश-विदेशातील हज (Hajj) यात्रेकरू जात आहेत. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये केरळ राज्यातील सिंहाब चोट्टर हा  मुस्लिम तरुण हज यात्रा  करण्यासाठी चक्क पायी निघाला आहे. व्हिडिओमध्ये हा तरुण पुढे चालत आहे आणि त्याच्या मागे मोठ्या संख्येने लोक आणि पोलिसही दिसत आहेत.

या तरुणासमोर पोलिसांची गाडीही धावत आहे, रस्ते मोकळे केले जात आहेत. फुले टाकून त्याचे स्वागत केले जात आहे. ८५०० किलोमीटरचा पायी प्रवास करुन हा युवक सौदी अरेबियात म्हणजे हज यात्रेत २०२३ मध्ये सामील होणार आहे. सध्या संपूर्ण भारतात याचीच चर्चा जोरात सुरू असुन त्याचे हजारो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुस्लिम समुदायात तो एक मोठा चर्चेचा विषय बनला आहे. पाच देशाच्या सीमा पार करुन तो हाज यात्रेत सहभागी होणार आहे.

केरळ येथील सिंहाब या तरुणाने पायी हज यात्रा करण्याचा संकल्प केला आहे. मुस्लिम समाजात हाज यात्रेला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र, ८५०० हून अधीक किलोमीटर पायी चालत जाणे, तेही पाच सहा देश पार करुन हा मोठा संकल्प घेऊन त्याने आपली पायी यात्रा सुरू केली आहे. दररोज ३० ते ३५ किलो मीटरचा प्रवास हा तरुण करत आहे.

मुस्लिम तरुणांची फौज त्याच्याबरोबर जागो जागी त्याला साथ देत आहे. या तरुणासोबतचे सर्व सेल्फी घेण्यासाठी  आटापिटा करत आहेत. मानवी साखळी करून लोक या तरुणाला साथ देत आहेत. हा तरुण गेल्या ५५ दिवसांपासून पायी चालत यात्रेला निघाला असून पुढच्या वर्षी हज यात्रेला जाण्याचा त्याचा मानस आहे. पायीच मक्का गाठून तो हाजी होणार आहे. त्यांनी केरळमधून प्रवास सुरू केला होता, आता तो गुजरात, राजस्थान, पंजाब  करीत त्याचा प्रवास पाकिस्तान, इराण, इराक, कुवेत  या देशातून होऊन सौदी अरेबियात तो पोहोचणार आहे.

सध्या सर्वत्र पाऊस सुरू आहे, अशा पावसातही त्याची पायी यात्रा सुरूच आहे. मुस्लिम समुदायात या तरुणाच्या यशस्वी हज यात्रेसाठी प्रार्थना करण्यात येत आहे. तर सर्वच धर्मातील समाजातील लोक अनेक ठिकाणी त्याचे स्वागत करताना दिसत आहे. अल्लाह प्रति निस्सीम प्रेमाची आणि भक्तीची भावना त्याच्या या संकल्पनेतून दिसून येते.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news