Uddhav Thackeray Interview : स्वत:च्या आईलाच गिळंकृत करणारी बंडखोरांची प्रवृत्ती; उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र | पुढारी

Uddhav Thackeray Interview : स्वत:च्या आईलाच गिळंकृत करणारी बंडखोरांची प्रवृत्ती; उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

पुढारी ऑनलाईन डेस्क :  ज्या आईने यांना हाताला धरून चालायला शिकवलं, वाढवलं, पाठीवर हात ठेवून मोठं केलं. त्याच आईच्या जिवावर उठलेत हे. स्वत:ला मोठं करणाऱ्या आईलाच गिळंकृत करायला निघाल्याची ही प्रवृत्ती असल्याचा आरोप शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार, खासदारांवर उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडले आहे.

राज्यातील राजकीय सत्ता नाट्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच सामनाला मुलाखत दिली. ‘सामना’चे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसारित झाला. यामध्ये पक्षप्रमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासह भाजपवर जोरदार शाब्दिक वार केले.

स्वत:च्या वडिलांचा फोटो लावा आणि राजकारण करा : उद्धव ठाकरे

भाजपला हिंदूंमध्ये फूट पाडायची आहे. शिवसेना आणि ठाकरे हे नातं त्यांना संपवायचं आहे. या बंडखोरांच्या मनात बाळासाहेबांच्याविषयी प्रेम नाही, तर त्यांना राजकारणासाठी माझ्या वडिलांच्या नावाचा उपयोग करून घ्यायचा आहे. हिंमत असेल तर तुमच्या वडिलांचे फोटो लावा, राजकारण करा आणि निवडून या. माझे वडील का चोरत आहात? बाळासाहेबांवरुन जनतेच्या मनात का संभ्रम निर्माण करत आहात? शिंदेंना आता ना पक्षप्रमुख व्हायचे आहे का? असा सवालही त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला.

देशात सत्यमेव जयते…सत्तामेव जयते नाही : उद्धव ठाकरे

देशाच्या घटनेवर, कायद्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. चोरीमारी सगळीकडेच चालते असं नाही, असं असेल तर सत्यमेव जयते हे वाक्य पुसावं लागेल. एकतर असत्यमेव जयते किंवा सत्तामेव जयते हे करावं लागेल. काही गोष्टीला पुरावे द्यावे लागत नाही तर वेळ आल्यावर जनताच अशा बेडखोरी करणाऱ्यांना पुरुन टाकेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

पाहा व्हिडिओ:

Back to top button