महाराष्ट्रासह देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावेन : कोल्‍हापूरच्‍या कुस्‍तीपटू श्रावणी लव्हटेचा विश्‍वास | पुढारी

महाराष्ट्रासह देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावेन : कोल्‍हापूरच्‍या कुस्‍तीपटू श्रावणी लव्हटेचा विश्‍वास

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक पटकाविणाऱ्या कुस्तीपटू श्रावणी लव्हटे हिचा नुकताच दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रात सत्कार करण्यात आला. कोल्हापूर जिल्हयातील पन्हाळा तालुक्याच्या कोताली येथील १५ वर्षाच्या श्रावणीने बेहरीन येथे  पार पडलेल्या एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेत ३६ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकाविले आहे. येत्या काळात अधिक परिश्रम करीत महाराष्ट्रासह देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावेन, असा विश्वास श्रावणीने यावेळी व्यक्त केला.

देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावेन – श्रावणी 

बेहरीन देशाच्या मनामा या राजधानीत २ ते ४ जुलै २०२२ दरम्यान एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेत श्रावणीने सहभाग घेतला होता. १५ वर्षाखालील फ्रीस्टाईल कुस्तीच्या ३६ किलो वजनी गटात श्रावणीने पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशासाठी रौप्यपदक पटकाविले. या स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर लखनऊ येथे १५ ते ३० जून २०२२ दरम्यान राष्ट्रीय प्रशिक्षण शिबीरात सहभाग घेवून श्रावणीने थेट बहरीन गाठले. तिने पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविले. प्रशिक्षक संदीप पाटील यांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळेच हे यश संपादन करू शकल्याच्या भावना  श्रावणीने व्यक्त केल्या.

वडील भाजी विकतात तर आई गृहीणी

श्रावणीचे वडील महादेव लव्हटे हे भाजी विकून कुटुंबाचा निर्वाह करतात व याकामी तिची आईही हातभार लावते. कुस्तीपटू चुलतभाऊ प्रसाद व आतेभाऊ विकास यांच्याकडून प्रेरणा घेतली. वयाच्या ११ व्या वर्षापासूनच श्रावणी कुस्ती क्रीडा प्रकाराकडे वळली. सहावीत असतानाच तालुका व जिल्हास्तरावरील कुस्तीस्पर्धेत भाग घेवून तिने सुवर्ण पदक पटकाविले. यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेत ४ तर राष्ट्रीय स्पर्धेत २ सुवर्ण व २ कांस्यपदक पटकावून श्रावणीने यशाचा आलेख उंचावत ठेवला. १५ व्या वर्षीच देशाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक मिळवून देणाऱ्या श्रावणीला अधिक मेहनत करून व विजयातील सातत्य राखत आंतराष्ट्रीय स्तराव कोल्हापूर ,महाराष्ट्र आणि भारत देशाचे नाव उंचवायचे आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button