कोल्हापूर : पूरबाधित क्षेत्र हॉस्पिटलमधील रुग्ण स्थलांतरासाठी सज्ज राहा | पुढारी

कोल्हापूर : पूरबाधित क्षेत्र हॉस्पिटलमधील रुग्ण स्थलांतरासाठी सज्ज राहा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठताच पूरबाधित क्षेत्रातील हॉस्पिटल व्यवस्थापनाने सर्व रुग्णांना स्थलांतरित करण्यासाठी सज्ज राहावे, अशी सूचना उपायुक्‍त रविकांत आडसूळ यांनी केली. पूरबाधित क्षेत्रातील खासगी हॉस्पिटल व्यवस्थापनाने पूर येण्यापूर्वी करावयाच्या उपाययोजनांबाबत उपायुक्‍त कार्यालयात संबंधित प्रतिनिधींची बैठक झाली.

पूर आल्यानंतर संबंधित हॉस्पिटलमधील रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होते. 2021 मधील महापुरावेळी महापालिकेला कोरोना रुग्णांसह इतर रुग्णांना व हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांना बोटीद्वारे पाण्यातून बाहेर काढावे लागले होते. सध्या कोल्हापुरात झपाट्याने पंचगंगेची पाणी पातळी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी पूरबाधित क्षेत्रातील रुग्णालयांच्या व्यवस्थापकांसोबत बैठक घेण्यात आली.
पूरबाधित क्षेत्रात दरवर्षी पूरस्थिती निर्माण होण्यापूर्वी महापालिकेच्या वतीने योग्य ती दक्षता व विविध उपाययोजना केल्या जातात.

राजाराम बंधारा येथे पाण्याची इशारा पातळी 39 फुटांपर्यंत असताना महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी समन्वय ठेवून आपत्ती येण्यापूर्वी रुग्ण व हॉस्पिटलमधील कर्मचारी वर्ग यांना स्थलांतरित करा अशा सूचना या बैठकीत उपायुक्‍त आडसूळ यांनी दिल्या. यावेळी हॉस्पिटलच्या प्रतिनिधींनी यास सहमती दर्शवून पाणी इशारा पातळीच्या वर गेल्यास तत्काळ रुग्णांना स्थलांतरित केले जाईल आणि पाण्याची पातळी पुन्हा 39 फुटांपेक्षा खाली येत नाही तोपर्यंत रुग्णालयामध्ये कोणताही रुग्ण दाखल करून न घेण्याची ग्वाहीदिली.यावेळी सहा. आयुक्‍त संदीप घार्गे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, सहा. अग्‍निशमन अधिकारी मनिष रणभिसे, समन्वय अधिकारी मनिष पवार यांच्यासह शहरातील विविध हॉस्पिटल्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Back to top button