कागल : सोनाळीच्या मारुती वैद्यकडून वरदच्या खूनाची कबूली पण (घटनाक्रम) | पुढारी

कागल : सोनाळीच्या मारुती वैद्यकडून वरदच्या खूनाची कबूली पण (घटनाक्रम)

सावर्डे बुद्रुक; पुढारी वृत्तसेवा : सोनाळी (ता.कागल) येथील अपहरण झालेल्या वरद रविंद्र पाटील या सात वर्षीय बालकाचा सावर्डे बुद्रुक येथे खून झाल्याचे निष्पन्न झाले. अपहरणाच्या चौथ्या दिवशी कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक गावच्या लक्ष्मीनगर शेजारील दक्षिणेस असणार्‍या शेतवडीत बालकाचा मृतदेह आढळला.

याबाबत आरोपी दत्तात्रय ऊर्फ मारुती तुकाराम वैद्य रा.सोनाळी (ता. कागल) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीची चौकशी कली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. खुनाचे कारण स्पष्ट झाले नाही. त्याच्यावर मुरगुड पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, वरद आपल्या आजोळी सावर्डे बुद्रुक येथे मंगळवारी त्याचे आजोबा दत्तात्रय शंकर म्हातुगडे यांच्या नवीन घराच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी कुटूंबियांसह गेला होता. रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास तो घरातून बाहेर गेला. त्यानंतर उशीरापर्यंत तो घरी परत न आल्याने रात्रभर कुटूंबियांनी त्याचा गावात शोध घेतला.

परंतू तो आढळून आला नाही. शोध घेऊनही तो न सापडल्याने त्याचे वडील रविंद्र पाटील यांनी मुरगूड पोलिसांत अज्ञात व्यक्तीने आपल्या मुलाचे अपहरण केल्याची तक्रार दाखल केली होती.

आज सकाळी या मुलाचा मृतदेह अर्धवट सडलेल्या अवस्थेत सापडला.

घटनेची माहिती समजताच घटना स्थळावर मुलाचे नातेवाईक व दोन्ही गावचे ग्रामस्थांनी मोठी गर्दी झाली होती.

घटनेचे गांभीर्य पाहता सोनाळी व सावर्डे बुद्रुक येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

आरोपीला हजर करा मगच प्रेत हलवा

पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेत असताना आरोपीला आपणासमोर हजर केल्याशिवाय प्रेत हलवू देणार नाही असा पवित्रा नातेवाइक व उपस्थितांनी घेतला. सुमारे दोन तास शववाहिका व पोलिस वाहने नागरिकांनी अडवून धरल्या होत्या.

पोलिस उपस्थितांना समजावत होते मात्र समुदाय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. बराच वेळ गोंधळाचे व तणावपूर्ण वातावरण होते.

शेवटी करवीरचे उप विभागीय पोलिस उपअधिक्षक आर.आर.पाटील व मुरगुड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी आरोपीला कडक शिक्षा होण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करु असे आश्वासन दिल्यानंतर समुदाय शांत झाला.

दरम्यान घटनास्थळाला पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधिक्षक तिरुपती काकडे यांनी भेट दिली.

अधिक तपास मुरगूडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे, पोलिस उपनिरीक्षक के.डी. ढेरे, बीट अंमलदार सतीश वर्णे, पोलिस नाईक स्वप्नील मोरे, संदीप ढेकळे, राम पाडळकर करत आहेत.

हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश…

गेले चार दिवसापासुन अपहरण झालेल्या मुलाचा खुन झाल्याचे समजताच मुलाचे नातेवाइक व सोनाळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

घटनास्थळी नातेवाइकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे ह्नदय पिळवटून टाकणारा होता.

मित्रानेच केला मित्राच्या मुलाचा घात…

खुन झालेल्या वरदचे वडील रविंद्र व आरोपी जवळचे मित्र होते. सावर्डे बुद्रुक येथे वरदच्या आजोबांच्या घराच्या वास्तुशांतीचा कार्यक्रम होता.

या कार्यक्रमासाठी आरोपीही हजर होता. येथुनच वरदला आरोपीने गायब केले होते.

वरद अचानक गायब झाल्याने त्याचा शोध कुटुंबियाकडुन सुरु होता. यावेळी आरोपी दत्तात्रय ऊर्फ मारुती तुकाराम वैद्य हाही शोध करण्यासाठी सोबत होता.

नरबळीची घटनास्थळी चर्चा…

आरोपी वैद्य याला गेल्या १५ वर्षांपासून  मुल-बाळ नसलेने नरबळी दिल्याने आपल्याला मुल होइल या उद्देशानेच वरदचा बळी घेतल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

पण पोलिसांनी खुनाचे नेमके कारण स्पष्ट नसल्याचे सांगितले.

घटनास्थळी महिलांची संख्या मोठी होती. यावेळी सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते. गोंधळाच्या वातावरणात महिला पोलिस जमावाला आवरण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र हे करत असताना त्यांनाही अश्रू अनावर झाले होते.

Back to top button