चिमुकल्याचा नरबळी : “माणसं आजही मध्ययुगातील विचारानेच वावरताहेत” | पुढारी

चिमुकल्याचा नरबळी : "माणसं आजही मध्ययुगातील विचारानेच वावरताहेत"

पुढारी ऑनलाईन डेस्क : “अपत्यप्राप्ती हेतूने ७ वर्षांच्या चिमुकल्याचा नरबळी दिल्याची घटना ही दुर्दैवी आहे. यावरून माणसं आधुनिक युगात वावरत असनूही विचाराने मात्र मध्ययुगात असल्याचं जाणवत आहे”, अशी प्रतिक्रिया अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजा शिरगुप्पे यांनी दिली आहे.

पुरोगामी समजल्या छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीमध्ये ७ वर्षांच्या मुलाचा नरबळी देण्याचा प्रकार नुकताच घडला आहे. वरद रविंद्र पाटील, असं या चिमुकल्याचं नाव असून परिसरात या मुलाच्या खुनाने खळबळ माजली आहे. कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रूक या गावात ही घटना घडली आहे.

वडिलांच्या मित्रानेच अपत्यप्राप्तीसाठी ७ वर्षांच्या मुलांचा नरबळी दिला आहे. संशयिताचे नाव मारुती तुकाराम वैद्य असं आहे, अशी माहिती मुरगूड पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. या दुर्दैवी घटनेवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आधुनिक युगातील माणसं मध्ययुगातच जगताहेत 

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजा शिरगुप्पे म्हणाले की, “२१ व्या शकतकातील आपलं सामाजिक आणि राजकीय वर्तन पाहिलं तर, खरंच आपण आधुनिक आणि प्रगत झालो का, असे प्रश्न सातत्याने पडावेत, अशी परिस्थिती आहे. ७ वर्षांच्या मुलांच्या नरबळीची घटनेतून हे अधोरेखित झालं आहे की, मध्ययुग आणि आधुनिक युगाच्या कात्रीत आपण सापडल्यासारखं जाणवतं. चिमुकल्याचा नरबळी या घटनेतून हे स्पष्ट झालं आहे की, विज्ञानायुगात विवेक बाजूला ठेवून आधुनिक गोष्टींचा व्यवहारिक उपयोग करत आहेत. पण, विचाराने मात्र माणसं मध्ययुगात जगताहेत की, काय, अशी वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण स्वतःला सातत्याने पुरोगामी म्हणताहोत, त्यात कुठेतरी दोष असल्याचं जाणवत आहे.”

नरबळीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करावा

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे हमीद दाभोळकर म्हणाले की, “या ७ वर्षांच्या मुलाच्या हत्येच्या प्रकरणामागे नरबळीसारखा प्रकार आहे का, याचा तपास पोलिसांनी करणं आवश्यक आहे. कारण, अंधश्रद्धेतून लहान मुलांचा बळी दिला जातो. पोलिसांना त्यादृष्टीने तपास करायला हवा, अशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीची मागणी आहे.”

नरबळीच्या सत्याच्या शोधासाठी अंनिस आग्रही

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कोल्हापुरचे जिल्हाध्यक्ष डाॅ. अरुण शिंदे म्हणाले की, “सावर्डे बुद्रूक परिसरात ७ वर्षांच्या मुलाची हत्या हा नरबळीचा प्रकार असल्याची चर्चा आहे. ही घटनेमागील नेमकं सत्य काय आहे, याचा तपास निष्पक्षपणे आणि स्वतंत्रपणे पोलिसांनी करावा. त्यामागील सत्य उजेडात आणावं. त्यानंतर संबंधितांवर पोलिस गुन्हे दाखल करून चौकशी करावी. या प्रकरणाची सखोल चौकशी आणि तपास व्हावा, यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने (अंनिस) पोलिसांनी निवेदन देण्यात येणार आहे.”

डाॅ. शिंदे पुढे म्हणाले की, “याशिवाय अंनिसचे कार्यकर्ते या गावी भेट देऊन, गावातील लोकांशी बोलून हे प्रकरण नेमकं काय आहे, याचाही तपास आम्ही करणार आहोत. जेणे करून पोलिसांच्या तपासाला मदत होईल. राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापुरसारख्या पुरोगामी शहारात अशी घटना घडावी, हे खूप दुःखद आणि वेदनादायी आहे. ही घटना नरबळीची असेल तर त्याच्या मूळाशी जाणं गरजेचं आहे. संबंधितांना कडक शिक्षा होणं गरजेचं आहे. आणि ही घटना नरबळीची नसेल तर जे काही सत्य या घटनेच्या तपासून पुढं यावं. या घटनेतील सत्य आणि तथ्याचा शोध घेतला जावा. त्यासाठी अंनिस आग्रही असेल.”

७ वर्षाच्या मुलाचा नरबळी ही लाच्छनास्पद घटना

अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सीमा पाटील म्हणाल्या की, “नरबळीतून ७ वर्षांच्या मुलाची हत्या, हा बातमी अस्वस्थ करणारी आहे. २१ व्या शतकातही अशा घटना घडताहेत, ही लाच्छनास्पद गोष्ट आहे. एक ७ वर्षांचा मुलगा आजोबांच्या घरातून बाहेर पडतो आणि तो सापडतच नाही. आणि जेव्हा सापडतो तेव्हा तो नरबळीसदृश स्थितीत निदर्षणास येतो. हे अत्यंत वेदनादानी चित्र आहे. ज्यावेळी अशा प्रकारच्या घटना घडतात, तेव्हा लक्षात येतं की, शिक्षण व्यवस्थेतच त्रूटी आहेत. नेमकं कोणत्या प्रकारचं शिक्षण मिळतं आहे आणि आजचं आधुनिक शिक्षण त्या लोकांपर्यंत पोहोचलं आहे की नाही? कारण, अशा नरबळीच्या घटना म्हणजे अशिक्षित आणि अज्ञानी असल्याचाच हा प्रकार आहे.”

“इतकं क्रूर कृत्य करताना त्या माणसाचं मन का हेलावत नाही, अशा गंभीर प्रश्न निर्माण होतो. अशा माणसांचा शोध घेऊन कडक शिक्षा करणं खूप गरजेचं आहे. केवळ शासन देऊन उपयोग नाही, तर अशा माणसांना समाजासमोर आणून उघडं पाडलं पाहिजे. कारण, यांची बुवाबाजी, अंधश्रद्धा आणि हे करत असणारी समाजाती पिळवणूक-फसवणूक समाजासमोर आणणं काळाची गरज झालेली आहे. या प्रकरणासंबंधी अंधश्रद्धा निर्मुलन समिती, कोल्हापूर शाखेच्या वतीने जबाबदारी घेऊ घटनास्थळी पोहोचणार आहोत. त्या विषयाचा पाठपुरावा करून त्याच्या मूळाशी असणाऱ्या बुवाबाशी पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत”, असंही मत सीमा पाटील यांनी मांडलं आहे.

सर्वांनी कृतिशील होणं गरजेचं आहे

अंसिनच्या कार्यकर्त्या कल्याणी अक्कोळे म्हणाले की, “पुरोगामी कोल्हापूर म्हणून मिरविणाऱ्या आपल्या सर्वांसाठी ही घटना अतिशय दुःखद आहे. अपत्य प्राप्तीसाठी अशी अमानुष कृती करण्याइतपत मानसिकता तयार व्हावी, आणि सध्याचा काळातसुद्धा अशा घटना घडव्यात यापेक्षा अस्वस्थ करणारे काय असू शकते? छत्रपती शाहूंच्या कोल्हापुरात, कागलमध्ये असे कृत्य घडणे म्हणजे छ. शाहूंचा, डॉ. दाभोळकरांचा वैचारिक वारसा पुढे नेण्यास आपण कमी पडत आहोत याची जाणीव तीव्र होत जाते. पुरोगामी म्हणून घेणाऱ्या सर्वांनी कृतिशील होण्याची गरज अधिकच जाणवत जाते.”

पहा व्हिडीओ : कोल्हापुरकरांनी जपलीय स्वातंत्र्यवीरांची रक्षा

Back to top button