कोल्हापूर : गारगोटीत बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेचा मोर्चा | पुढारी

कोल्हापूर : गारगोटीत बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेचा मोर्चा

गारगोटी; पुढारी वृत्तसेवा : बंडखोर आमदारांच्या विरोधात गारगोटी येथील हुतात्मा चौकात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र संताप व्यक्त केला. शिवसैनिकांचा मोर्चा आमदार आबिटकर यांच्या घराकडे जात असताना पोलिसांनी मोर्चा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरच रोखला. शिवसैनिकांच्या या आंदोलनामुळे गारगोटीला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह बंडखोर आमदारांच्या विरोधातील आंदोलनासाठी शिवसैनिक हुतात्मा चौकात एकत्रित जमले. येथे जोरदार घोषणाबाजी करून आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह बंडखोरांच्या भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी बंडखोर आमदारांनी स्वगृही परतावे. अन्यथा गद्दार आमदारांना जनताच धडा शिकवेल असा इशारा दिला. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्वव ठाकरेंशी गद्दारी केल्यामुळे शिवसैनिक यापुढेही बंडखोर आमदारांच्या विरोधात सर्वत्र रस्त्यावर उतरतील असा ईशारा त्यांनी यावेळी दिला.

हुतात्मा चौकातून सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आमदार आबीटकर यांच्या घराकडे जात असताना पोलिसांनी त्यांना वाटेतच रोखून ताब्यात घेतले. या आंदोलनात तालुका प्रमुख अविनाश शिंदे, रंजना आंबेकर, राजू सावंत, उत्तम पाटील, तानाजी देसाई, भिकाजी हळदकर, युवराज पोवार, मेरी डिसोजा, माया शिंदे, विजेता मसुरेकर आदींसह शिवसैनिक सहभागी झाले होते.

या आंदोलनामुळे गारगोटीला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. पोलिसांनी साई मंदिर, सार्वजनिक बांधकाम विभाग येथे पोलीस बंदोबस्त लावून आमदार आबिटकर यांच्या घरासमोरून जाणारा मुख्य रस्ता बंद केला होता. सुमारे शेकडो पोलिसासह दोन दंगल प्रतिबंधक पथके तैनात करण्यात आली होती. सर्वत्र पोलीस पथके दिसल्यामुळे गारगोटीला अक्षरश: पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी भेट देऊन याबबातची माहिती घेतली. डीवायएसपी राजीव नवले, पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता.

प्रशासनाची दमछाक

बुधवारी गारगोटीचा आठवडा बाजार असतो. यादिवशी हजारो नागरीक हजेरी लावतात. याच दरम्यान शिवसैनिकांनी मोर्चा काढल्यामुळे नागरीकांची मोठी गैरसोय झाली. तर प्रशासन कमालीचे तणवाखाली आले होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button