‘पंतप्रधानांच्या नेतृत्वावर जनतेचे शिक्कामोर्तब : महेश लांडगे | पुढारी

‘पंतप्रधानांच्या नेतृत्वावर जनतेचे शिक्कामोर्तब : महेश लांडगे

पिंपरी : लोकसभेच्या तीन व विधानसभेच्या सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने यश खेचून आणले आहे. देशातील सर्वसामान्य जनतादेखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपसोबत असल्याचे त्यामुळे सिद्ध झाले आहे, असे मत भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले आहे.

आमदार लांडगे म्हणाले की, तब्बल 20 वर्षांच्या न्यायालयीन संघर्षास संयमितपणे सामोरे जाणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील काँग्रेसच्या जकिया जाफरी यांची याचिका निकाली काढून सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान मोदी यांच्या निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे भाजपची मान अभिमानाने उंचावली आहे.

देशाच्या न्यायव्यवस्थेवर भाजपचा पूर्ण विश्वास असल्यामुळेच वीस वर्षे चाललेल्या या न्यायालयीन लढाईत भाजपने कोठेही शक्तिप्रदर्शन, आंदोलने किंवा टीकाटिपणी करून न्यायप्रक्रियेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही. याउलट, पंतप्रधान मोदी हे या प्रक्रियेस संयमाने सामोरे गेले. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने प्रस्थापित पक्षांचे बुरुज उध्वस्त करून पक्षाचा झेंडा रोवला आहे.

पोटनिवडणुकांतील या विजयाआधी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयानेच निकाली काढली. सन 2002 मधील गुजरात दंगलप्रकरणी नरेंद्र मोदी यांच्यासह 64 जणांना निर्दोष ठरविण्याच्या विशष चौकशी पथकाच्या निर्णयास काँग्रेसच्या जकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. गुजरात उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तेथेही विशेष चौकशी पथकाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Back to top button