हुपरीतील अमजद नदाफ यांचे कार्य सौहार्द भावनेची साक्ष देणारे : संजय राऊत | पुढारी

हुपरीतील अमजद नदाफ यांचे कार्य सौहार्द भावनेची साक्ष देणारे : संजय राऊत

हुपरी पुढारी वृत्तसेवा : राजस्थान येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे  सुशोभीकरण व मूर्तीची रंगरंगोटी करण्यासाठी हुपरी (जि. कोल्हापूर) येथील माजी नगरसेवक आणि ‘दै. पुढारी’चे पत्रकार अमजद नदाफ यांनी पुढाकार घेतला होता. त्यांचे हे कार्य प्रेरणादायी, कौतुकास्पद  असून  महाराष्ट्राच्या मातीत असलेल्या सौहार्द  भावनेची साक्ष देणारे आहे, असे गौरवोद्गार शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी अमजद नदाफ यांना पाठवलेल्या पत्रात काढले आहेत.

काही महिन्यापूर्वी अमजद नदाफ हे अजमेर राजस्थान येथे गेले होते. तेथे मुख्य चौकात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज उद्यान दिसले. यावेळी त्यांना त्या उद्यानाची रंगरंगोटी पूर्णपणे गेल्याचे दिसले. त्यामुळे नदाफ यांनी महापालिका व मुख्यमंत्री यांच्याशी पाठपुरावा करुन मूर्तीचे तसेच उद्यानाचे सुशोभीकरण करुन घेतले होते. कोल्हापूर येथे खासदार संजय राऊत आले होते. तेव्हा त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन या कार्याची माहिती देण्यात आली होती.

या महत्वपूर्ण कार्याची दखल घेत खासदार संजय राऊत यानी  नदाफ यांना अभिनंदनाचे पत्र पाठवून आपण केलेले कार्य कौतुकास्पद, अभिनंदनीय आणि प्रेरणादायी असल्याचे  म्हटले आहे. हजारो किलोमीटर दूरवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती रंगकामासाठी राजस्थान सरकारशी संपर्क केला. महाराष्ट्राच्या मातीत असलेल्या  सौहार्द भावनेची साक्ष  अमजद नदाफ यांच्या कार्यातून दिसून आली. त्यांनी समाजोपयोगी व बंधुत्वाची भावना वृद्धिगंत करणारे कार्य यापुढेही सुरू ठेवावे, अशा शुभेच्छा संजय राऊत यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा

Back to top button