पिंपरी: कोरोनाचा दुसरा डोस घेण्यात तरुण पिछाडीवर; 30 टक्के जणांचा डोस बाकी | पुढारी

पिंपरी: कोरोनाचा दुसरा डोस घेण्यात तरुण पिछाडीवर; 30 टक्के जणांचा डोस बाकी

पिंपरी: कोरोनाचा दुसरा डोस घेण्यात सध्या तरुण पिछाडीवर आहेत. पहिला डोस घेतलेल्या तरुणांपैकी 30.37 टक्के तरुणांनी दुसरा डोसच घेतलेला नसल्याचे समोर आले आहे.15 ते 18 वयोगटातील तरुणांबाबत सध्या हे चित्र पाहण्यास मिळत आहे. तरुणांमध्ये कोरोनाचा दुसरा डोस घेण्याबाबत असलेली ही उदासीनता बदलण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
शहरात आजअखेर 18 लाख 47 हजार 98 नागरिकांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे.

त्यापैकी 16 लाख 90 हजार 730 नागरिकांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे. म्हणजेच कोरोनाच्या पहिल्या डोसच्या तुलनेत जवळपास 91.53 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. शहरात 15 ते 18 या वयोगटातील 71 हजार 447 तरुणांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे. मात्र, त्यापैकी 49 हजार 752 तरुणांनीच कोरोनाचा दुसरा डोस घेतला असल्याची बाब समोर आली आहे. म्हणजे जवळपास 30.37 टक्के तरुणांनी अद्याप कोरोनाचा दुसरा डोसच घेतलेला नाही.

18 ते 44 वयोगटात सर्वाधिक लसीकरण

18 ते 44 वयोगटात सर्वांधिक लसीकरण झाले आहे. या वयोगटात 11 लाख 87 हजार 296 नागरिकांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे. त्यापैकी 11 लाख 15 हजार 802 नागरिकांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे. म्हणजे पहिल्या डोसच्या तुलनेत 93.98 टक्के नागरिकांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

मुलांचे लसीकरण सर्वांत कमी

शहरातील 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण सर्वात कमी आहे. या वयोगटात आत्तापर्यंत 29 हजार 54 मुलांनी पहिला डोस घेतला आहे. त्यापैकी 12 हजार 460 मुलांनी दुसरा डोस घेतला आहे. म्हणजे पहिल्या डोसच्या तुलनेत दुसरा डोस घेणार्‍या मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण हे 42.88 टक्के इतके अत्यल्प आहे.

शहरातील सर्व नागरिकांचे कोरोनाचे लसीकरण पूर्ण व्हावे, यादृष्टीने महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांचा कोरोनाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे, त्यांनी दिलेल्या तारखेनुसार कोरोनाचा दुसरा डोस घ्यावा. कोरोनाच्या लस गरजेनुसारच केंद्रांवर उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे या लस वाया जात नाहीत.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

Back to top button