

कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा : कस्तुरी सावेकरने जगातील अवघड अन्नपूर्णा आणि एव्हरेस्ट शिखर सर करून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला! ही दोन शिखरे सर करणारी ती देशातील पहिली महिला ठरली. याउपर तिचे वडील दीपक सावेकर यांना दोन शिखरांसाठी आलेल्या अवाढव्य खर्चाचा 'एव्हरेस्ट' अद्याप सर करता आलेला नाही.
अनेकांचे मिळून सुमारे 17 लाख रुपये देणे असून त्यांच्यासमोर गॅरेज विकण्याव्यतिरिक्त पर्याय उरलेला नाही. समाजमनाने मदतीचा हात दिला तर सावेकर कुटुंबावरील हे ओझे कमी होईल. कोल्हापुरातील पांजरपोळ येथे वडिलांचा चारचाकी गाड्यांचा मेकॅनिक व्यवसाय… त्यांचे गॅरेजही साधे पत्र्याचे… घरची परिस्थिती बेताची… आपल्या सर्व गरजा बाजूला सारून आई-वडिलांनी कस्तुरीचे स्वप्न साकार करण्यासाठी रक्ताचे पाणी केले.
एव्हरेस्टचा 49 लाख रुपयांचा खर्च पेलणे त्यांच्यासमोर आव्हान होते. प्रत्येक शाळेत, उद्योजकांकडे जाऊन त्यांनी 2021 मध्ये पै पै उभा केला. यादरम्यान कस्तुरीच्या आईला दागिने विकण्याचीही वेळ आली. मात्र, खराब हवामानामुळे कस्तुरीला 2021 ची एव्हरेस्ट मोहीम निम्म्यावर सोडून परतावे लागले होते. कस्तुरीची 2022 ची मोहीम यशस्वी करण्यासाठी दीपक सावेकर यांच्यासमोर पुन्हा आर्थिक आव्हान होते. पुन्हा आवाहन करण्यात आले. समाजातील अनेकांनी दातृत्व दाखविले. यातून काही मदत उभा राहिली. मात्र प्रत्यक्ष एव्हरेस्ट मोहिमेची तारीख आली, त्यावेळी उर्वरित रक्कम भरणे गरजेचे होते; खिसा रिकामा होता. अशा वेळी त्यांनी काही दिवसांच्या मुदतीवर हातउसने पैसे घेऊन नेपाळमधील गिर्यारोहण संस्थेला अखेर रक्कम पाठविली.
त्यामुळे कस्तुरी इतिहास घडवू शकली. गुगल पेसह उद्योजकांनी सीएसआर फंडच्या (8 टीजीचा लाभ) माध्यमातून
मदत करावी, असे आवाहन दीपक सावेकर यांनी केले आहे. कस्तुरीला मदत करण्यासाठी दीपक सावेकर यांच्या 9822681005 या गुगल पेवर यथाशक्ती मदत पाठवून स्क्रीनशॉट पाठवून त्यांना संपर्क करावा.
स्टेट बँक ऑफ इंडिया
शाखा : प्रतिभानगर, कोल्हापूर
खात्याचे नाव : करवीर हायकर्स, कोल्हापूर
खाते क्रमांक : 39214749732
आयएफएससी कोड : SBIN0017527
संपर्क क्रमांक : 9822681005
क्यूआर कोड स्कॅन करून आर्थिक मदत करावी.
हेही वाचा