

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने शनिवार, 25 जूनपासून सुरू होणार्या विद्यापीठाच्या स्तरवरील सर्व अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. मार्च-एप्रिल 2021-22 या शैक्षणिक सत्रातील या परीक्षा आहेत.
विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचे निर्णय झाला.त्यानुसार शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा ऑफलाईन वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचे जाहीर केले. मात्र काही विद्यापीठांनी ऑनलाईन, ऑफलाईन वर्णनात्मक, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने परीक्षांबाबत धोरण जाहीर केल्याने विद्यार्थी संघटनांनी आंदोलने केली. परीक्षा विभागाने विधी व अभियांत्रिकीच्या परीक्षा एमसीक्यू पद्धतीने घेण्याचे परिपत्रक प्रसिद्ध करताच शुक्रवारी विद्यापीठासमोर विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले.
दुपारी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याशी विद्यार्थी संघटना कृती समितीची चर्चा झाली. तेव्हा विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर परीक्षा विभागाने परिपत्रक प्रसिद्ध करून काही अपरिहार्य कारणास्तव विद्यापीठ स्तरावरील परीक्षा स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. याचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे. मात्र महाविद्यालय स्तरावरील पदवी प्रथम वर्ष पारंपरिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा महाविद्यालयांच्या नियोजनानुसार सुरूच राहणार आहेत.