औद्योगिक क्षेत्रात कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर व्हावा | पुढारी

औद्योगिक क्षेत्रात कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर व्हावा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या उद्योगाची मोठी परंपरा आहे. शाहू महाराजांनी अनेक उद्योग उभारून औद्योगिक विकासाला गती दिली, यामुळे जिल्हा औद्योगिक क्षेत्रात संपन्‍न आहे. जिल्ह्यातील तरुणांनी, महिलांनी उद्यमिता यात्रेतून प्रशिक्षण घेवून नवीन उद्योग व्यवसायात यशस्वी व्हावे, असे आवाहन करत औद्योगिक क्षेत्रात कोल्हापूर जिल्हा राज्यात पुढे यावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्‍त केली.

राज्य कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, कौशल्य विकास सोसायटी आणि यूथ अ‍ॅण्ड फाऊंडेशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात राज्यव्यापी उद्यमिता यात्रेद्वारे तीन दिवसीय व्यवसाय विकास प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. त्याचा प्रारंभ जिल्हाधिकारी रेखावार यांच्या हस्ते झाला. जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, कोल्हापूरचा प्रत्येक व्यक्‍ती आत्मविश्‍वासाने परिपूर्ण आहे. त्यामुळे उद्योजक बनण्यासाठी त्यांना केवळ योग्य दिशा देणे आवश्यक आहे. नवनवीन बाबींची माहिती घ्या. आवश्यक ते ज्ञान आत्मसात करा. प्रशिक्षण घ्या आणि यशस्वी उद्योजक बना.

मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, कोल्हापुरातील नागरिक व्यवसायाभिमुख आहेत. शहरे आणि गावांत महाविद्यालयांबरोबरच औद्योगिक प्रशिक्षण संस्थाही निर्माण व्हायला हव्यात. यूथ फाऊंडेशनचे मॅथ्यू मत्तम म्हणाले, औद्योगिक क्षेत्राला अधिकाधिक चालना देणे आवश्यक आहे.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्‍त संजय माळी म्हणाले, 10 मे रोजी मुंबई येथून सुरू झालेल्या या यात्रेच्या वतीने 3 महिला आणि युवकांना मार्गदर्शन करत 4 हजार व्यावसायिक तयार करण्याचे नियोजन आहे.
कोल्हापूर इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. अभिजित माने यांनी या सेंटरद्वारे बरोजगार युवक, महिलांना प्रशिक्षण देऊन व्यवसायाला चालना दिली जात आहे. यावेळी यात्रेचे राज्य समन्वयक मनोज भोसले, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रवींद्र मुंडासे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button