

कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा सिद्धगिरी हॉस्पिटलने जगातील दुर्मीळ आणि मेंदूंच्या रक्तवाहिन्यांचा सर्वात मोठा फुगवटा असणार्या आजारावरील ब्रेन बायपास सर्जरी यशस्वी केली. गेल्या 8 वर्षांपासून संबंधित रुग्ण या आजाराने त्रस्त होता. यामुळे रुग्णाचे दोन्ही डोळे निकामी झाल्याने अन्य डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया करण्यास असमर्थता दर्शवली होती. तब्बल 11 तास ही शस्त्रक्रिया करून रुग्णास जीवदान देण्यात यशस्वी झाल्याची माहिती मेंदू तज्ज्ञ डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकार बैठकीत दिली.
डॉ. मरजक्के म्हणाले, रुग्णाच्या मेंदूत 10.5 मिमी एवढा फुगवटा होता. अशा स्थितीत 50 टक्के रुग्ण दगावण्याची शक्यता असते. रुग्णाच्या मेंदूपासून अक्कल दाढेपर्यंत त्यांची व्याप्ती वाढली होती. त्यामुळे त्यांच्या नाकातून आणि तोंडातून रक्तप्रवाह सुरू झाला होता. हाताच्या शिरेचा तुकडा वापरून बायपास पद्धतीने गळ्याच्या त्वचेखालून मेंदूपर्यंत शीर जोडून मेंदूचा रक्तपुरवठा सुरू करण्यात आला. त्यानंतर मेंदूमध्ये फुगलेली शीर दोन्ही टोकांकडून बंद करण्यात आली. यासाठी न्युरो भूलतज्ज्ञ डॉ. प्रकाश भरमगोंडर, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमोल भोले यांचे विशेष सहकार्य मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले, सिद्धगिरी हॉस्पिटल वैद्यकीय हब होत आहे. मेंदूवरील सर्व शस्त्रक्रिया येथे केल्या जातात. डॉ. मरजक्के यांनी आतापर्यंत 12 हजारांपेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या आहेत. हॉस्पिटलमध्ये गरजूंवर माफक आणि मोफत उपचार केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार बैठकीला डॉ. प्रकाश भरमगोंडर उपस्थित होते.
हेही वाचा