5-जी सेवा अर्थव्यवस्थेसाठी ठरणार ‘सुपर बूस्टर’! हे होणार फायदे | पुढारी

5-जी सेवा अर्थव्यवस्थेसाठी ठरणार ‘सुपर बूस्टर'! हे होणार फायदे

मुंबई;  पुढारी वृत्तसेवा : आतापर्यंत मोबाईल तंत्रज्ञानाने 4 जी पर्यंत ज्या गतीने आयुष्य बदलले आणि जगण्याची गती वाढवली त्यापेक्षा दुप्पट वेगाने 5 जीची डिजिटल क्रांती येऊ घातली आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज, औद्योगिक आयओटी तसेच रोबोटिक्स तंत्रज्ञानातील प्रगतीची दारे खुली होतील. ‘ई-गव्हर्नन्स’ची व्यापकता वाढेल. कोरोनात विस्कटलेली आर्थिक घडी आता सावरते आहेच. लसीचा ‘बूस्टर डोस’ही सुरू आहे, इथून पुढे 5-जी सुरू होणे ही बाब अर्थव्यवस्थेसाठी ‘सुपर बूस्ट’ (चालना) ठरणार आहे.

कृषी, आरोग्य, रोजगार, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल होतीलच; पण रस्त्यावर चालकाशिवाय कार चाललेली आहे, याची कल्पनाही तुम्ही आज करू शकता का? नाही! तर… 5-जी सेवा सुरू होताच चालकरहित कार ही कल्पना वास्तवात उतरण्याची शक्यताही बळावणार आहे.

5-जी सेवेनंतर होणार हे फायदे

1) वेग वाढणार : मोबाईलवरील इंटरनेटचा वेग वाढेल. काही मिनिटांत नव्हे; तर काही सेकंदात तुम्ही काहीही डाऊनलोड करू शकाल. ‘लाईव्ह स्ट्रिमिंग’ कुठल्याही व्यत्ययाशिवाय तासन्तास सलग बघू शकाल.

2) जीव वाचणार : 5-जी रोड म्हणजेच रस्त्यांवर सेन्सर्सच्या मदतीने स्वयंचलित पद्धतीने लोकांचा जीव वाचवता येईल. 5-जीच्या मदतीने गाडीत सेन्सर काम करेल आणि तुमच्या वाहनाच्या आसपास कुठलाही धोका येताच यातील ऑटोनॉमस सिस्टीम त्याचा वेधही घेईल आणि आपोआप ब्रेकही लागेल.

3) शेतकर्‍यांना उपयुक्त : कृषी क्षेत्र डिजिटलाईज्ड होण्यात मोठी मदत होईल. ड्रोनच्या मदतीने 5-जी तंत्रातून जमिनीचा पोतही तपासता येईल. शेतकर्‍यांना त्याचा लाभ होईल.

4) रोजगार उपलब्ध होणार : नोकर्‍यांच्या, रोजगाराच्या संधी वाढतील. भारतासारख्या बेरोजगारी अधिक असलेल्या देशात तर 5-जी फारच उपयुक्त ठरणार. अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

5) आरोग्य सुविधेस लाभ : 5-जीच्या मदतीने देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा पोहोचवता येतील. मेडिकल डिव्हाईस जोडून कुणाचीही घरबसल्या वैद्यकीय तपासणी करता येईल. एक्स-रेही काढता येऊ शकेल.

Back to top button