आजरा : साखर कारखाना बेअरिंग चोरी प्रकरणी पाचजण ताब्यात | पुढारी

आजरा : साखर कारखाना बेअरिंग चोरी प्रकरणी पाचजण ताब्यात

आजरा : पुढारी वृत्तसेवा; गवसे (ता. आजरा) येथील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील सहा बेअरिंग चोरी प्रकरणी आजरा पोलीसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये या चोरीची फिर्याद देणारे तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालकांचा समावेश आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

स्क्रॅप खरेदीदार जैनुल शमशाद उर्फ बाबा खान (वय ५४, रा. योगायोग नगर, पुजारी मळा इचलकरंजी), तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालक प्रकाश रामचंद्र चव्हाण (वय ५२ रा. पेद्रवाडी ता. आजरा), स्टोअर किपर दिनकर उर्फ गुलाब बाबुराव हसबे (वय ५३ रा. चांदेवाडी ता. आजरा), सुरक्षा मुख्यााधिकारी भरत गणपती तानवडे (वय ६२ रा. देवर्डे ता. आजरा), सुरक्षा रक्षक मनोहर यशवंत हसबे (वय ४९ रा. चांदेवाडी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

या चोरी प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. आणखी काहीजण संशयाच्या भोवर्‍यात आहेत. त्यासंदर्भात योग्य ते पुरावे हाती लागाताच त्यांनाही ताब्यात घेतले जाणार असल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले आहे.

काय आहे प्रकरण

आजरा साखर कारखाना दोन हंगाम बंद होता. १७ फेब्रुवारी २०१९ ते २६ जुलै २०२१ या काळात कारखान्यातील सहा बेअरिंगची चोरी झाली. यामध्ये २७० किलोच्या चार तर ९२ किलोच्या दोन बेअरिंगचा समावेश होता. सहा बेअरिंगची किंमत ३ लाख ५ हजार २०० रूपये आहे. गेल्या एक वर्षापासून या प्रकरणाची तालुक्यात जोरदार चर्चा आहे. कारखाना प्रशासनाने चौकशी समिती नेमून ३४ जणांवर ठपका ठेवला होता. त्यानंतर कारखाना कामगार संघटना व इतरांच्या निवेदनामुळे चोरी तपास प्रकरणाला वेग आला. अखेर गुरूवारी मध्यरात्री १२ वाजून १६ मिनिटांनी पाच संशयितांना आजरा पोलीसांनी ताब्यात घेतले, असल्याची माहिती आजर्‍याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे यांनी दिली.

हेही वाचा :

 

Back to top button