कोल्हापूर पुढारी ऑनलाईन :
शाहू महाराज हे छत्रपती आहेत, छत्रपतींना कोण चुकीची माहिती देणार ?, असा सवाल करत त्याच्याविषयी असे बोलून त्यांचा कृपया अपमान करू नका, अशी अप्रत्यक्ष टीका खा. संजय राऊत यांनी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. खा. राऊत यांनी आज शाहू महाराजांची कोल्हापूरातील न्यू पॅलेस येथे भेट घेतली. यानंतर माध्यमांशी ते बाेलत हाेते. यावेळी राज्यसभेचे उमेदवार, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवारही होते.
राऊत म्हणाले, शाहू महाराज यांची भेट घ्यावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी मला दिले होते. त्यानुसार आज मी त्यांची भेट घेतली. छत्रपती शाहू महाराज आणि राऊत यांच्या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी शाहू महाराजांशी फोनवरून संवाद साधला. ठाकरे आणि छत्रपती घरण्याचे खास नाते असून, प्रबोधनकार ठाकरे आणि कोल्हापूरच्या राजघराण्याचे जूने ऋणानुबंध असल्याचेही राऊत यांनी सांगितले. शाहू महाराज यांच्या भेटीमागे कोणतेही राजकारण नाही. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून महाराज यांची भेट घेण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजघराण्याचा कोणताही अपमान केला नाही, असे शाहू महाराज म्हणाले हाेते. यानंतर संभाजीराजेंनी ट्वीट करत मी पत्रकार परिषदेत जे बोललो ते सत्यच बोललो असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काही किडक्या डोक्याच्या लोकांनी महाराजांना स्क्रिप्ट तयार करुन चुकीची माहिती दिली आहे. ते लोक महाराजांना खोटी माहिती देऊन संभाजीराजेंना खोटं ठरवतं आहेत. दुसरीकडे शाहू महाराज आणि संभाजीराजेंमध्ये काहीतरी अंतर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत," असे म्हणाले हाेते. त्याला राऊत यांनी आज असा अप्रत्यतक्ष टोला लगावला.