शाहुवाडी : अनैतिक संबंधास ठरला अडसर, गुप्तांग सुरीने कापून पत्नीकडून पतीची हत्या | पुढारी

शाहुवाडी : अनैतिक संबंधास ठरला अडसर, गुप्तांग सुरीने कापून पत्नीकडून पतीची हत्या

सरुड; पुढारी वृत्तसेवा : अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याच्या कारणावरुन पत्नीने मद्यपी पतीचे जांभा दगडावर डोके आपटून, सुरीने गुप्तांग कापून आणि गळा आवळून अत्यंत निर्घुणपणे खून केला. ही धक्कादायक घटना सोमवारी दुपारी शाहुवाडीतील तालुक्यातील नांदगाव पैकी मांगुरवाडी येथे घडली. प्रकाश पांडुरंग कांबळे (वय ५२, रा. लोळाणे, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. संशयित आरोपी वंदना प्रकाश कांबळे (वय ५०) हिने शाहूवाडी पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली असून तिच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिला तातडीने अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोळाणे येथील प्रकाश पांडुरंग कांबळे हा पत्नी वंदना हिच्यासह नांदगाव पैकी मांगुरवाडी (ता. शाहूवाडी) येथील शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून गत वर्षभरापासून कामास राहिला होता. दारूच्या आहारी गेलेला प्रकाश हा पत्नी वंदना हिला मारहाण करून त्रास देत होता. सततचे भांडण आणि शारीरिक त्रास देखिल देत होता. शिवाय अनैतिक संबधात अडथळा ठरत असल्याने वंदना हिने सोमवारी दुपारी दारूच्या नशेत चुर असलेल्या पती प्रकाश याची जांभा दगडावर डोके आपटून, गळा आवळून आणि सुरीने गुप्तांग कापून निर्दयपणे निर्घृण हत्त्या केली. आरोपी वंदना हिने क्रूरतेचा कळस गाठल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पो. ना. चिंतामणी बांबळे, उत्तम भुरुगडे यांनी पोलिस पाटील व साक्षीदारांसमक्ष पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला.

आत्महत्येचा बनाव आणि मृतदेह परस्पर

दरम्यान प्रकाश मृत झाल्याची खात्री करून पत्नी वंदनाने प्रकाशचा मृतदेह दोरीने घरात लटकून ठेवला आणि पतीने दारूच्या नशेत आत्महत्या केल्याचा बनाव रचला. पोलिस ठाण्यात तिने तशी वर्दीही दिली. लोळाणे या मूळगावी मृतदेह घेऊन जाण्यासाठी संशयित पत्नीची परस्पर धडपड सुरू होती. याला स्थानिक पोलिस पाटील, शेत मालक तसेच ग्रामस्थांनी विरोध केला. मृतदेह खाली उतरताना चिऱ्यावर डोके आपटून जखम झाल्याची बतावणी करणाऱ्या संशयित वंदनाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच पत्नी वंदनाने घडाघडा घटनेची वास्तव माहिती देत खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली.

दरम्यान मलकापूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलेल्या मृतदेहाच्या शवविच्छेदनातून गळा आवळल्याने तसेच गुप्तांग कापल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. गुन्ह्यात आणखी कोण सहभागी आहे का, यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. पोलिस निरीक्षक विजय पाटील, पोसई पांढरे हे गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

Back to top button