कोल्हापूर शहर, जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले

कोल्हापूर शहर, जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागाला वादळी वार्‍यासह पावसाने गुरुवारी सायंकाळी जोरदार तडाखा दिला. सुमारे अर्धा तास विजांच्या कडकडाटासह पावसाने शहर व जिल्ह्याला झोडपून काढले. काही ठिकाणी गारांचाही वर्षाव झाला. कोल्हापूर-पन्हाळा, कोल्हापूर-गगनबावडा, कोल्हापूर-सांगलीसह पुणे-बंगळूर महामार्गासह अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. हणमंतवाडीत गोठ्याची भिंत कोसळली. पावसाने घरांसह वीट व्यावसायिक व सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. मादळे येथे विजेच्या धक्क्याने दोन म्हशींचा मृत्यू झाला. वीज पुरवठा खंडित झाल्याने निम्म्याहून अधिक शहर उशिरापर्यंत अंधारात होते.

कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर केर्लीनजीक धावत्या चारचाकीवर झाड कोसळले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र या मार्गासह कोल्हापूर-रत्नागिरीमार्गे कोकणात जाणारी तसेच कोल्हापूरकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. तब्बल तीन तासांनंतर ही वाहतूक पूर्ववत करण्यात यश आले. कसबा बावड्यातही चारचाकीवर झाड कोसळल्याने कार पूर्णतः चेपली. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर बालिंग्याजवळही झाड पडले. यामुळे एका बाजूने वाहतूक सुरू होती.परिणामी या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. सांगली-कोल्हापूर मार्गावर अतिग्रेजवळ झाड कोसळले. यामुळे या मार्गावरील वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती. पुणे-बंगळूर मार्गावर वाठारनजीक झाड कोसळल्याने कोल्हापूरकडे येणार्‍या वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात 22 ठिकाणी झाडे कोसळली.

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात वाढ होत आहे. दररोज पारा वाढत 40 अंशापर्यंत गेला. आजही सकाळपासून हवेत कमालीचा उष्मा होता. दुपारी उन्हाची तीव-ताही अधिक होती. अंगाची लाही लाही करणार्‍या उन्हाने नागरिक अक्षरश: हैराण झाले होते. दुपारी तापमान 39 अंशावर गेले होते. सायंकाळी वातावरण ढगाळ झाले. ढग इतके दाटून आले होते की, दुपारी साडेचारच्या सुमारास सायंकाळचे साडेसहा-पावणेसात वाजल्यासारखे चित्र दिसत होते. कोल्हापूर शहर तसेच परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार वारे सुटले. वार्‍याचा वेग तुलनेने अधिक जाणवत होता. बहुतांशी झाडे वेगाने सळसळत होती. यामुळे शहरातील अनेक रस्त्यावर झाडांच्या छोट्या फांद्या, पाने, फुले, शेंगा आदींचा जणू सडाच पडला होता. सोसाट्याच्या वार्‍याने अनेक ठिकाणी धुळीचे लोट उठत होते. शहरात काही क्षण समोरचे काहीच दिसत नव्हते. 15-20 फूट उंचीवर कचराही उडत होता. प्लास्टिक पिशव्यांसह कचराही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पसरला होता. काही ठिकाणी वार्‍याने फलक, फ्लेक्स फाटले. दुकानावरील फलकही काही ठिकाणी खाली पडले.

वादळी वारे आणि त्यापाठोपाठ आलेल्या पावसाने विक्रेते, व्यापार्‍यांचे हाल झाले. दुकानाबाहेर मांडलेेले साहित्य सुरक्षितस्थळी हलवताना त्यांची दमछाक झाली. घराकडे परतणार्‍या नागरिकांचे पावसाने हाल झाले. काहींनी भिजतच घर गाठण्याचा प्रयत्न केला तर काहींनी पावसापासून बचाव करत दुकाने, बस थांबे, पानाच्या टपर्‍या आदी ज्या ज्या ठिकाणी सुरक्षित जागा मिळेल, त्या ठिकाणी आडोसा घेतला. अचानक झालेल्या पावसाने भाविक आणि पर्यटकांचेही हाल झाले. अनेक रिक्षाथांब्यावर रिक्षाही मिळत नव्हत्या. पावसाने रस्त्यावरील वाहतूक वर्दळ काही काळ मंदावली. मात्र पाऊस थांबल्यानंतर वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आल्याने भाऊसिंगजी रोड, स्टेशन रोड, उमा टॉकीज रोड, उड्डाणपूल आदी अनेक प्रमुख मार्गावर तसेच सिग्‍नलवर वाहनांचा रांगा लागल्या होत्या. इचलकरंजी, कागल, राधानगरी परिसरासह जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी पाऊस झाला. हातकणंगले तालुक्यातील खोची, भेंडवडे, बुवाचे वाठार आदी परिसरात जोरदार पाऊस झाला. या परिसरातील घरांची कौले, शेडवरील पत्रे उडून गेले. वीज वाहिन्याही तुटल्याने अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला. या परिसरातील सोयाबीन पिकाचे पावसाने नुकसान झाले.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news