सातारा : किसनवीर मकरंद आबांकडे द्या; माझा हट्ट पुरवा – ना. रामराजे नाईक निंबाळकर | पुढारी

सातारा : किसनवीर मकरंद आबांकडे द्या; माझा हट्ट पुरवा - ना. रामराजे नाईक निंबाळकर

खंडाळा : पुढारी वृत्तसेवा
सत्ताधार्‍यांच्या दुर्लक्षामुळे कारखान्याची अवस्था बिकट झाली. किसनवीरचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी मकरंद आबांच्यावर विश्‍वास ठेवा.तुमच्या मनात असलेला कारखाना सुस्थितीत आणण्याचे काम हे माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर काम आहे. हा माझा हट्ट पुरवा. किसनवीर साखर कारखाना मकरंद आबांच्या हातात द्या, अशी भावनिक साद ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभासदांना घातली. दुसर्‍यांनी केलेले पाप फेडून सामान्य शेतकर्‍यांचे हित जपण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

खंडाळ्यात किसनवीर बचाव शेतकरी पॅनलच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आ. मकरंद पाटील, जेष्ठ नेते बकाजीराव पाटील, जि. प. अध्यक्ष उदय कबुले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, माजी सभापती राजेंद्र तांबे, मनोज पवार, दिपाली साळुंखे, प्रतापराव पवार, राजेंद्र राजपुरे, राहुल घाडगे, शिवाजीराव शेळके, हणमंतराव साळुंखे, प्रा. एस. वाय. पवार, चंद्रकांत ढमाळ, शारदाताई जाधव, रामदास गाढवे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

ना. रामराजे नाईक- निंबाळकर म्हणाले, या कारखान्यावर अनेक संस्था व लोकांचे अर्थकारण अवलंबून आहे. पाणी आले, ऊस आला पण वेळेत ऊस तुटला नाही तर काय हाल होतात, हे तुम्ही अनुभवले आहे. शरद पवार यांचे विचार, अजितदादांचे मार्गदर्शन व मकरंदआबांच्या नेतृत्वाखाली आपल्या सर्वांच्या मदतीने आपण ही निवडणूक जिंकणार आहे. जरंडेश्वर कारखाना सुरु नसता तर लोकांचे काय हाल झाले असते? साखरवाडी, श्रीराम कारखाना यांनी या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांचा ऊस तोडून मदत केली.

आ. मकरंद पाटील म्हणाले, या कारखान्याची निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. तिन्ही कारखान्यांचे प्रचंड कर्जाचे ओझे आपण का डोक्यावर घ्यायचे? वाई तालुक्यातील 70 ते 75 हजार टन ऊस शेतात उभा होता. इतर तालुक्यातील परिस्थितीही भयंकर असताना शेतकर्‍यांची अवस्था पाहुन लोकहितासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. जेष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन व जिल्ह्यातील आमदारांसोबत बैठक घेऊन शेतकर्‍यांचे हित जोपासण्यासाठी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीचा गुलाल घेऊन कारखान्यासाठी चांगला निर्णय करून घेणार आहे. वाई, जावली, कोरेगांव तालुक्यातील शेतकर्‍यांकडून 13 ते 14 लाख टन ऊस उत्पादन घेतले जाते. मग कारखाना तोट्यात जातोच कसा? खंडाळा कारखाना 35 कोटी, किसनवीर 175 कोटी रुपये तोट्यात आणला. कारखान्यात आम्हाला राजकारण करायचे नाही. मात्र ही संस्था वाचावी म्हणून तुम्हाला बिनविरोध निवडून दिले. तुमच्यावर असलेली जबाबदारी तुम्ही ठामपणे पार पाडली नाही. तुम्ही लावलेले दिवे सर्व सभासदांना माहीत आहेत. हा व खंडाळा कारखाना अखेरपर्यंत सामान्य सभासदांच्या मालकीचाच राहील.

ऊस मजूर परतीच्या वाटेला लागल्यावर आपण कारखाना सुरु केल्याचे नाटक केले. कोणतीही तयारी न करता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कारखाना सुरु केला खरा पण आता दररोज किती गाळप केले? कारखान्याची गाळप क्षमता किती? हेही एकदा सभासदांना सांगा. या भ्रष्टाचारी माणसाला सत्तेवरुन खाली खेचुन सर्वसामान्य शेतकर्‍यांचे पॅनल निवडुन आणा, असे आवाहनही आ. मकरंद पाटील यांनी केले. यावेळी बकाजीराव पाटील, प्रतापराव पवार, शामराव गाढवे, शारदाताई जाधव, राहुल घाडगे, प्रा. एस. वाय. पवार, नितिन भरगुडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मनोज पवार यांनी केले.

आ. महेश शिंदेंनी पाच तालुक्यातील लोकांचे हित पाहून योग्य काम करावे : ना. रामराजे

गावागावातील गट तट विसरून आपले संसार उभे करण्यासाठी आ. मकरंदआबांशिवाय पर्याय नाही. आ. महेश शिंदेंनी पाच तालुक्यातील लोकांचे हित पाहून योग्य काम करावे. कृष्णा, सह्याद्रीप्रमाणे किसनवीर कारखाना हे जिल्ह्याचे वैभव होते. तुमच्या मनात असलेला कारखाना सुस्थितीत आणण्याचे काम हे माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर काम आहे, असेही ना. रामराजे म्हणाले.

Back to top button