राज्यपालांचे वक्‍तव्य बुद्धीला न पटणारे – खा. सुप्रिया सुळे | पुढारी

राज्यपालांचे वक्‍तव्य बुद्धीला न पटणारे - खा. सुप्रिया सुळे

सातारा : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादीचे आ. अमोल मेटकरी यांनी केलेल्या वक्‍तव्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यावर सातारा जिल्हा दौर्‍यावर असलेल्या खा. सुप्रिया सुळे यांनी बोलण्यास नकार देत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या जुन्या वक्‍तव्याचा धागा पकडत राज्यपालांनी सावित्रीबाई फुले यांच्याबाबत केलेले वक्‍तव्य माझ्या बुद्धीला पटणारे नसल्याचा टोला पत्रकारांशी बोलताना लगावला.

खा. सुप्रिया सुळे या सातारा जिल्हा दौर्‍यावर आल्या असताना पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, आ. अमोल मेटकरी यांच्या वक्‍तव्याबाबत प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील हे सविस्तर बोलले आहेत. मेटकरींनी केलेले विधान मी पूर्ण ऐकले नसल्यामुळे त्यावर बोलणे योग्य नाही. मध्यंतरी मी राज्यपालांचे एक भाषण ऐकले होते. त्यात त्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जे वक्‍तव्य केले ते माझ्या बुध्दीला न पटणारे आहे. ज्यांच्याकडे आम्ही एक आदर्श म्हणून बघतो. त्यांच्या विचारातून आम्ही मार्गदर्शन घेतो. त्या व्यक्तीबद्दल अनादराने बोलणे हे मला संयुक्तिक वाटत नसल्याची टिकाही त्यांनी केली.त्या पुढे म्हणाल्या, महिला अत्याचाराचा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. त्याचा विचार आपण समाज म्हणून केला पाहिजे. संविधानाप्रमाणे ज्या गोष्टी योग्य आहेत त्याचा आपण आदर राखला पाहिजे. वैयक्तीकपणे हे सर्व मला अयोग्य वाटते. अत्याचारप्रकरणी कारवाईचा विषय कोणत्या पक्षाचा किंवा राजकारणाचा नाही. गेली दोन वर्ष सर्व खासदारांचा निधी बंद आहे. मला स्वत:लाच निधी मिळालेला नाही. केंद्र शासनाने कोविडच्या निमित्ताने सर्व खासदारांना निधीच देणे बंद केले आहे. दोन वर्ष निधी आला नसल्याने सर्व खासदार आज सरकारच्या विरोधात बोलत आहेत.

तसेच राज्यसभेमध्ये महिलांना समान नेतृत्व आहे. लोकसभेत मी स्वत: राष्ट्रवादीची लिडर म्हणून काम पहात आहे. रुपालीताई चाकणकर या सुध्दा महिला आयोगाचा चांगला कारभार संभाळत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये महिलांची ताकद कमी आहे हे म्हणणे चुकीचे आहे, असे सांगून त्या म्हणाल्या, साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे व जयसिंगराव पवार यांचे साहित्य मी नेहमीच वाचत असते. ते माझे गुरु व मागदर्शक आहेत. त्यामुळे ज्या-ज्या वेळी सातारा दौर्‍यावर मी येईल त्या-त्या वेळी मी त्यांची भेट घेण्याची संधी कधीच सोडत नाही. कोल्हापूर येथे जयसिंगराव पवार यांचीही भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी आ. शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सूनील माने, सरचिटणीस राजकूमार पाटील, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, स्मिता देशमुख व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी कार्यालयास खा.सुप्रिया सुळे यांची भेट

सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयास खा. सुप्रिया सुळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी पक्षाच्यावतीने खा. सुळे यांचे आ. शशिकांत शिंदे व जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. पक्ष कार्यालयात खा. सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. यावेळी जि. प. सदस्य दिपक पवार, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, स्मिता देशमुख, शशिकांत वायकर उपस्थित होते.

Back to top button