राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथील 'ते' वानर अखेर जेरबंद ! | पुढारी

राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथील 'ते' वानर अखेर जेरबंद !

गुडाळ (जि.कोल्‍हापूर), पुढारी वृत्तसेवा : राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात गेले तीन दिवस एका वानराने उच्छाद मांडला होता. त्‍याने सहा जणांना चावा घेऊन जखमी केले. या नर वानराला अखेर जेरबंद करण्यात वनविभाग आणि रेस्क्यू टीमला गुरुवारी (दि.14) सायंकाळी यश आले आहे.

दरम्यान, सापळ्यात पकडलेल्या या वानराला रात्री दाजीपूरच्या जंगलात सोडण्यात आल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात मोठमोठी निलगिरीची झाडे आहेत. गेले तीन दिवस या परिसरात तळ ठोकलेल्या वानराने दोन दिवसात चौघांना चावे घेत उच्छाद मांडला होता. वन विभागाने बुधवारी रेस्क्यू टीमला पाचारण करून या बिथरलेल्या वानराला पकडण्याचा दिवसभर प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नांना अपयश आले.

आज पुन्हा या वानराने तानाजी कांबळे आणि केरबा वरणे या तारळेतील दोन ग्रामस्थांचा चावा घेतला. वनविभाग आणि रेस्क्यू टीमकडून गुरुवारी दिवसभर वानराला पकडण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर साडेपाच वाजता मोठी जाळी पसरून त्यावर फळे ठेवून वानराला जेरबंद करण्यात आले. नंतर त्याला पिंजऱ्यात बंदिस्त केले. आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.

हे वानर पिसाळलेले नसून हार्मोन्सच्या बदलामुळे किंवा अज्ञाताने दगड मारल्यामुळे ते बिथरले असण्याची शक्यता आहे, असे रेस्क्यू टीमचे ऋषिकेश सुतार यांनी सांगितले. या मोहिमेत वनविभाग, रेस्क्यू टीम, ग्रामपंचायत कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ आणि राधानगरीच्या तरुणांनी सहभाग घेतला.

हेही वाचा  

Back to top button