शिरोळ : शरद पवार, अशोक बंग यांना उद्या समाजभूषण पुरस्कार होणार प्रदान | पुढारी

शिरोळ : शरद पवार, अशोक बंग यांना उद्या समाजभूषण पुरस्कार होणार प्रदान

शिरोळ; पुढारी वृत्तसेवा: दत्त साखरचे संस्थापक, मा.आ.व समाजवादी नेते, स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या 7 व्या पुण्यतिथी व जन्म शताब्दी वर्षाचे औचित्य साधून आज शनिवारी माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व अशोक बंग यांना समाजभूषण पुरस्कार दिला जाणार आहे. हा पुरस्कार सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तर दै. पुढारीचे संपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी माहिती फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक,निवड समितीचे प्रमुख व दत्त साखरचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिली.

शिरोळ येथील दत्त कारखाना कार्यस्थळावर दत्ताजीराव कदम क्रीडांगणावर पुरस्कार सोहळ्याची जयंत तयारी करण्यात आली आहे. भव्य शामियाना व व्यासपीठ, हेलिपॅड मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी स्वागत कमानी, शुभेच्छा फलक, सा.रे.पाटील यांचे जीवनचरित्र सांगणारे फोटो प्रदर्शन, बैठक व्यवस्था, रंगरंगोटी, विद्युत रोषणाई असे सुशोभीकरण करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता समाज भूषण पुरस्काराचे अनावरण करण्यात येणार आहे. 1 लाख एक हजार एकशे अकरा रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

स्व. डॉ. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आतापर्यंत पुरोगामी नेते प्राध्यापक एन. डी. पाटील, माजी विधानसभा सदस्य स्व. गणपतराव देशमुख, माजी मंत्री व तत्त्वनिष्ठ राजकारणी स्व. बी. जे. खताळ-पाटील, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील महिला उद्योजिका चेतना गालासिन्हा यांना देण्यात आला आहे. स्व.डॉ.सा.रे.पाटील यांनी आयुष्यातील सात दशकात तालुका आणि परिसरातील शेतकरी, शेती, शिक्षण, सहकार, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय व अनुकरणीय काम केले. त्यांचे कार्य अजरामर राहावे यासाठी स्मृती दिनाचे औचित्य साधून गेली पाच वर्षे हा पुरस्कार दिला जात आहे.

हेही वाचा

Back to top button