नवउद्योग कर्ज वितरणात कोल्हापूर आघाडीवर | पुढारी

नवउद्योग कर्ज वितरणात कोल्हापूर आघाडीवर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या आर्थिक वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या वतीने उद्योग-व्यापारासाठी देण्यात आलेल्या विविध योजनांचा कोल्हापूर जिल्ह्यातील नवउद्योजकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे. प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅमअंतर्गत जिल्ह्यातील 200 हून अधिक प्रकरणांमध्ये 11 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. कोल्हापूर जिल्हा उद्योग केंद्र या योजनेंतर्गत महाराष्ट्रात आघाडीवर आहे.

जिल्ह्याला 2021-22 मध्ये पीक कर्जाचे वार्षिक उद्दिष्ट 2720 कोटींचे देण्यात आले होते. फेब—ुवारी अखेर 2330 कोटी इतके वाटप झाले आहे. हे प्रमाण वार्षिक उद्दिष्टाच्या 86 टक्के इतके आहे. शासकीय महामंडळामार्फत बँकांकडे पाठविण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये बँकांची कामे असमाधानकारक आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत 2021-22 अंतर्गत जिल्ह्याला 7410 बचत गट यामध्ये 160 कोटींचे उद्दिष्ट होते. 112 टक्के भौतिक व 97 टक्के आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे.

पीएमईजीपीअंतर्गत कर्ज मंजुरीमध्ये जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके यांनी सांगितले. या योजनेंतर्गत 220 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. ज्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करावयाचा आहे, त्यांच्यासाठी ही योजना आहे. कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले.

या काळात स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाखांपासून 25 लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले जाते. या योजनेंतर्गत 10 टक्क्यांपासून 25 टक्क्यांपर्यंत सबसिडी देण्यात येते. जिल्ह्याच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यामध्ये जिल्ह्यास प्राथमिक क्षेत्राकरिता 10,210 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 31 डिसेंबर 2021 अखेर एकूण उद्दिष्टापैकी 6,795 कोटी (67 टक्के वार्षिक) इतकी उद्दिष्टपूर्तता झाल्याचे अग्रणी जिल्हा व्यवस्थापक गणेश शिंदे यांनी सांगितले.

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत शिशू, किशोर, तरुण या सर्व योजनांमध्ये डिसेंबर 2021 अखेर 86,896 लोकांना वित्त पुरवठा केला असून, त्यांना 847 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. पीएम स्वनिधी योजनेंतर्गत जिल्ह्यात पथविक्रेत्यांना कर्ज वाटपाचे काम प्रगतिपथावर असून, 10,614 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

विविध योजनांतर्गत बँकांमध्ये उघडण्यात आलेली खाती

जिल्ह्यात 31 डिसेंबर 2021 पर्यंत पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत बँकांमध्ये 12 लाख 21 हजार 947 खाती उघडण्यात आली आहेत. 8 लाख 70 हजार 282 खात्यांमध्ये रूपे कार्ड प्रदान करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेंतर्गत 6 लाख 49 हजार 213 खाती उघडण्यात आली. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची 2 लाख 58 हजार 412 खाती उघडण्यात आली आहेत. प्रधानमंत्री जीवनज्योती व सुरक्षा विमा योजनेंंतर्गत 2021-22 मध्ये 214 खात्यांमध्ये मृत व्यक्तींच्या वारसांना 4.28 कोटी रुपये विम्याची रक्कम मिळाली आहे.

Back to top button