कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची तारीख जाहीर | पुढारी

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची तारीख जाहीर

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची तारीख राज्य निवडणूक आयोगाकडून आज जाहीर करण्यात आली. या जागेसाठी १२ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. १७ मार्चपासून उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार आहेत. तसेच १६ एप्रिल रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने या रिक्त जागेवर पोटनिवडणूक घेतली जाणार होती. कोल्हापूरकरांना अनेक दिवसांपासून या पोटनिवडणुकीची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आज राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक कार्यक्रमाच्या तारखा जाहीर केल्या.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे तत्कालिन आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्यावर त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी मिळणे हे जवळ जवळ निश्चित मानले जात आहे. आता भाजपकडून या जागेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या श्रद्धांजली सभेमध्ये कोल्हापूर उत्तरच्या जागेवर जयश्री जाधव यांना बिनविरोध निवडूण आणावे, असे आवाहन विरोधी पक्षांना केले होते. त्यामुळे भाजप या जागेसाठी उमेदवार देतो की, ही पोटनिवडणूक बिनविरोध ठरणार याकडे कोल्हापूर शहरासह अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील अन्य पाच राज्यातील विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. कोल्हापूरसह पश्चिम बंगालमध्ये दोन जांगावर तर छत्तीसगड आणि बिहार मधील एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक कार्यक्रम

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी १७ मार्च पासून उमेदवार अर्ज दाखल केले जाणार आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २४ मार्च असणार आहे. तसेच २५ मार्च पर्यंत अर्जांची छाननी केली जाणार आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २८ मार्च असेल, तर १२ एप्रिल रोजी मतदान आणि १६ एप्रिल रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

 

Back to top button