पुणे : राजुरी परिसरात झुंजीत बिबट्याचा मृत्यू ; महिन्याभरात दुसरी घटना | पुढारी

पुणे : राजुरी परिसरात झुंजीत बिबट्याचा मृत्यू ; महिन्याभरात दुसरी घटना

आळेफाटा, पुढारी वृत्तसेवा : हिवरमळा येथील उसाच्या शेतात दोन बिबट्यांची झुंज होऊन त्यात सहा ते सात वर्षाच्या नर जातीच्या बिबट्याचा (Leopard) मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. १२) सकाळी उघडकीस आली. दोन नर बिबट्यांमध्ये हद्दीवरून झालेल्या झुंजीत एकाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे.

याबाबत मिळालेली माहितीनुसार, राजुरी (ता.जुन्नर) येथील हिवर मळ्यातील सुदाम पंडु औटी यांच्या उसाच्या शेतात बिबटया (Leopard) मृतावस्थेत आढळला. याची माहिती मिळताच वनविभागाचे संतोष साळुंखे, वैभव काचळे, स्वप्नील हाडवळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत बिबट्याची अवस्था पाहता दोन नर बिबट्यांमध्ये हद्दीवरून झालेल्या झुंजीतून एका बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. मृत बिबट्यास माणिकडोह येथील बिबटया निवारण केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.

दरम्यान, मागील महिन्यात १२ फेब्रुवारीला राजुरी शिवारात दोन बिबटयांच्या झुंजीत एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा बरोबर एक महिन्यांनी अशाच प्रकारे बिबटया मृतावस्थेत सापडला आहे. राजुरी परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या ऊस तोडणी संपत आल्यामुळे बिबट्यांना लपून रहायला जागा राहिलेली नाही. त्यातच खाद्यासाठी ते नागरी वस्तीत येत आहेत. परिसरात आणखी बिबटे असून त्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.

हेही वाचलंत ? 

पहा व्हिडिओ : चला दख्खनचा राजा जोतिबाचा महिमा ऐकूया : महिमा श्री केदारलिंगाचा…

Back to top button