दोन वर्षांनंतर रविवारी पल्स पोलिओ मोहीम | पुढारी

दोन वर्षांनंतर रविवारी पल्स पोलिओ मोहीम

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

पोलिओ निर्मूलनासाठी दोन वर्षांनंतर शून्य ते पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना रविवारी (दि.27) पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत. यावर्षी जिल्ह्यातील 2 हजार 423 केंद्रांवर 3 लाख 8 हजार 360 बालकांना डोस देण्यात येणार आहेत. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजना करून बालकांना पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत. या मोहिमेंतर्गत जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात केंद्रे स्थापन करण्यात आली असून, त्याकरिता 6999 कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यासाठी 3 लाख 90 हजार पोलिओ डोस प्राप्त झाले आहेत. नुकतेच जन्मलेल्या बाळालादेखील पोलिओ डोस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व बाजार, धार्मिकस्थळे, बसस्थानके, टोल नाके व रेल्वेस्टेशनवर तसेच दुर्गम भागातील वाड्यावस्त्यांवरील भटक्या जमाती, ऊसतोडणी मजूर यांच्या मुलांना पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.

आशा कर्मचारी संघटनांचा इशारा

आशा व गटप्रवर्तकांचा ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांचा नियमित कामाचा मोबदला तसेच अन्य सर्व थकीत मानधन शुक्रवार (दि. 25) पर्यंत न दिल्यास दि. 27 फेब—ुवारी रोजी राबविण्यात येणार्‍या पल्स पोलिओ मोहिमेवर बहिष्कार टाकण्यात येईल, असे निवेदन कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदनावर संघटनेच्या जिल्हाध्यक्ष नेत्रदीपा पाटील, शहर अध्यक्ष ज्योती तावरे, उज्ज्वला पाटील, संगीता पाटील यांच्या सह्या आहेत.

Back to top button