नात्यांना तडा! इचलकरंजीतील घटनेनंतर समाजमन सुन्न | पुढारी

नात्यांना तडा! इचलकरंजीतील घटनेनंतर समाजमन सुन्न

इचलकरंजी : बाबासो राजमाने

इचलकरंजीतील पती-पत्नी आणि बाप-लेकीच्या भावनिक नात्याला तडा देणार्‍या खुनाच्या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे. शहरात नातेसंबंधातून वाढत असलेली गुन्हेगारीही अस्वस्थ करणारी ठरत आहे. कौटुंबिक संवाद, युवक-युवतींचे प्रबोधन, पोलिसांचे नागरिकांशी सलोख्याचे संबंध राखण्यासाठी उपाययोजनांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

इचलकरंजी शहरातील वाढती गुन्हेगारी, अल्पवयीन मुलांचा त्यातील वाढता सहभाग हा चिंतेचा विषय बनला आहे. मंगळवारी रात्री दोघींच्याही प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने सुजाता केटकाळे व तिच्या विशीच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलीने पित्याचा गजाने, बॅटने व चाकूने निर्घृण खून केला. या घटनेने शहर हादरून गेले.

कुटुंबातील वाढत्या हिंसाचाराच्या घटना इतर गुन्ह्यांपेक्षा जास्त गुंतागुंतीच्या असतात. आरोग्य, आर्थिक संकटापाठोपाठ नातेसंबंधावरील संकट अनेकवेळा मन विषण्ण करणारे ठरत आहेत. शहर परिसरात यापूर्वी नातेसंबंधातून खुनाच्या पाचघटना घडल्या आहेत. त्याचबरोबर बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणार्‍या घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र, प्रेमसंबंधाच्या कारणावरून आई व मुलीने मिळून वडिलांना संपवण्याची इचलकरंजीत घडलेली घटना जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे कुटुंबातील वादही आता एखाद्याला संपवण्यापर्यंत पोहोचत असल्यामुळे सामाजिक चिंतेचा विषय बनत चालला आहे.

नातेसंबंधातून घडलेल्या खुनाच्या घटना

  • 17 वर्षीय साक्षी काटकर या तरुणीला वडिलांनी नदीत ढकलून दिले.
  • औषधोपचाराचा खर्च परवडत नाही म्हणून वडिलांनीच अफान मुल्ला या मुलाची हत्या केली.
  • यळगूड येथील प्रणाली साळुंखे या मुलीची हत्या सावत्र बापाने केली.
  • कबनूर येथे जावयाने केलेल्या हल्ल्यात धोंडिराम रावणे या सासर्‍याने गमावला जीव.
  • चोरीतील सोने व पैशाच्या वाटणीतून पती-पत्नी व अन्य संशयितांनी मिळून कृष्णात लोहार (रा. कबनूर) याचा खून केला.

Back to top button