मडगाव : पुढारी वृत्तसेवा
राज्यात कार्निव्हल हा लोकपरंपरेचा भाग आहे. राज्यातील कला दर्शवणारा लोकोत्सव म्हणून, कार्निव्हल साजरा केला जातो. यंदाही लोकसंस्कृती पुढे नेण्याचा प्रयत्न इंत्रुजच्या माध्यमातून केले जाणार आहे. लोकपरंपरा ही थीम धरूनच यावर्षी कार्निव्हल केला जाणार असल्याचे प्रतिपादन मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी तथा कार्निव्हल समितीचे अध्यक्ष आग्नेलो फर्नांडिस यांनी केले. मडगाव कार्निव्हल समितीतर्फे यावर्षीच्या कार्निव्हलचा लोगो तसेच गीत यांचे अनावरण करण्यात आले.
यावेळी समिती सचिव मनोज आर्सेकर व खजिनदार विशांत नाईक उपस्थित होते. फर्नांडिस यांनी सांगितले की, पर्यटन विभागाच्या व मडगाव पालिकेच्या संयुक्त विद्यमाने 25 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत कार्निव्हल व प्रत्येक प्रभागनिहाय खेळाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 25 फेब्रुवारी रोजी क्ले व फॅन्सी ड्रेस स्पर्धा व जॉन फर्नांडिस यांचा पारंपरिक इंत्रुज होईल. 26 रोजी मास्क व फेस प्रिंटिंग व सायंकाळी वेऴ्ळी येथील एडोनिस व सहकार्यांचा इंत्रुज दी वेळ्ळी हा कार्यक्रम होणार आहे. कोव्हिडचे सर्व नियम पाळूनच दक्षिण गोवा जिल्हा न्यायालय ते फातोर्डा बोरकर सुपर स्टोअर्सपर्यंत 27 फेब्रुवारी रोजी मुख्य मिरवणूक काढली जाणार आहे.
पर्यटन विभागाकडून कार्निव्हलसाठी देण्यात येणारा निधी मिळण्यास गेल्यावर्षी उशीर झाला होता. यावर्षी पर्यटन विभागाकडे 50 टक्के निधी कार्निव्हलच्या आधी देण्याची मागणी केलेली आहे. यावर्षी तसा प्रश्न येणार नाही. कोणत्याही प्रकारचा संस्कृती न दर्शवणारा आक्षेपार्ह चित्ररथ मिरवणूक सहभागी करून घेणार नाही. आचारसंहिता लागू असल्याने कोणत्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी प्रयत्नशील राहणार, असेही फर्नांडिस यांनी सांगितले.