गारगोटी : पुढारी वृत्तसेवा
कोरोना महामारीने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. सुखी संसाराची राखरांगोळी झाली. म्हसवे (ता. भुदरगड) येथील मोरे कुटुंबावरही कोरोनाने असाच आघात कोसळला. घरातील कर्त्या मोतेश मोरे या तरुणाचा कोरोनाने बळी घेतला आणि त्याची पत्नी स्वाती अन् सव्वा वर्षाचा चिमुकला सुयशच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरपले. मात्र, अशा स्थितीत मोतेशचा लहान भाऊ अक्षय मोरे याने सर्व रूढी-परंपरांना छेद देत विधवा भावजयीशी विवाह करून समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला.
म्हसवे येथील मोतेश मोरे याचा विवाह तीन वर्षांपूर्वी स्वाती माने हिच्याशी झाला होता. दोघांचा सुखाचा संसार सुरू होता. त्यांना एक गोंडस मुलगाही झाला. या सुखी संसाराला दृष्ट लागली आणि मोतेश व त्याचे संपूर्ण कुटुंबीय कोरोनाग्रस्त झाले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, मोतेशचा कोरोनामुळे मृत्यू झाला अन् मोरे व माने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
स्वातीवर तर दुःखाचे आभाळच कोसळले अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले. मोतेशच्या मृत्यूनंतर मोरे व माने कुटुंबीयांनी स्वातीला या प्रसंगात खंबीर साथ दिली. मोतेशचा लहान भाऊ अक्षयने आपण स्वातीसह तिच्या बाळाला स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगितले. स्वातीसह घरच्यांनीही त्याला संमती दर्शविली. रांगोळी (ता. हातकणंगले) येथे दोन्ही कुटुंबीयांच्या व मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा अनोखा मंगल विवाह सोहळा पार पडला. अक्षय व स्वाती यांचा हा पुनर्विवाह समाजासमोर आदर्श असा पुनर्विवाह ठरला आहे.