कोल्हापूर : मुका जीव देखील गलबलला सरणावरच्या धन्याला पाहून.!

कोल्हापूर : मुका जीव देखील गलबलला सरणावरच्या धन्याला पाहून.!
Published on
Updated on

हमीदवाडा ; पुढारी वृत्तसेवा : तीन वर्षे रात्रंदिवस ज्या आपल्या अंध धन्याची सोबत केली त्याच धन्याच्या अखेरच्या प्रवासात अगदी स्मशानातच नव्हे तर चक्क सरणावर जाऊन दर्शन घेऊन व्याकुळ झालेल्या लाडक्या श्वानाच्या प्रेमविव्हळतेने उपस्थित देखील गहिवरले होते.! घटना आहे कागल तालुक्यातील कुरूकली येथील.

येथील महादेव विष्णू शेटके या ५४ वर्षीय पूर्णतः अंध, अविवाहित असलेल्या विठ्ठल भक्ताचे निधन झाले. शेटके यांनी आयुष्यभर पांडुरंगाची निष्ठेने सेवा केली. अंध असून देखील हरिपाठ काकडा व कित्येक अभंग पाठ. गेली तीन वर्षे त्यांचा घरातील गुड्ड्या नावाचा कुत्रा व त्यांच्यातील ऋणानुबंध अगदी दृढ झाले होते. अगदी घरातील एखाद्या सदस्याप्रमाणे गुड्ड्या

सोबत त्यांचा मैत्रभाव जुळला होता. गल्लीत किंवा आसपास ते जात असताना त्यांच्यापुढे प्रथम गुड्ड्या ची सवारी असायची व वाटेत गुड्ड्या
थांबला की त्याच्याजवळ थांबायचे व तो पुढे चालू लागला की त्याच्या मागे हळू हळू चालायचे. शेटके यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना जेव्हा स्मशानात नेण्यात आले त्यावेळी त्यांचा लाडका गुड्ड्या कुत्रा देखील सर्वांच्या मागून गेला. इतकेच नव्हे तर चित्ता रचत असताना तो भोवती फिरत होता,झाकलेल्या प्रेताजवळ वारंवार जात होता.

शेवटी चित्तेवर प्रेत ठेवल्यावर व चेहरा उघडा केल्यानंतर गुड्ड्या थेट दोन्ही पाय वर ठेवून सरणावर आला व त्याने आपल्या लाडक्या धन्याच्या हाताला व कपाळाला चाटून आपली व्याकूळता व्यक्त केली. अंत्यसंस्कार करताना त्याला धरून बाजूला आणले होते.

 मात्र सर्वजण माघारी परतल्यावर देखील तो बराच वेळ तिथेच घुटमळत होता नंतर त्याला इतर लोकांनी घरी आणले. त्याच बरोबर घटना घडलेल्या पूर्ण दिवस व रात्री त्याने काहीही खाल्ले नाही. अशाप्रकारे एका मुक्या जीवाने लावलेला गळा व धन्याच्या अखेरच्या प्रवासातही दाखवलेले प्रेम ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय असून याबाबतचे फोटो देखील व्हायरल होत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news