भाविकांच्या उपस्थितीत होणार जोतिबाचे खेटे | पुढारी

भाविकांच्या उपस्थितीत होणार जोतिबाचे खेटे

जोतिबा डोंगर : पुढारी वृत्तसेवा

जोतिबा मंदिरात सध्या सुरू असलेल्या ई-पास व लहान मुलांना प्रवेश बंदी या नियमांमुळे होणारी कुचंबना आणि सातत्याने होणारे वाद लक्षात घेता ई-पास आणि लहान मुलांना प्रवेश बंदी रद्द करावी, अशी आग्रही मागणी पुजार्‍यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली. रविवारपासून सुरू होणार्‍या खेट्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी नियोजनासाठी गुरुवारी सायंकाळी बैठक झाली.

दख्खनचा राजा श्री जोतिबाचे बहुतांश भाविक ग्रामीण भागातील असल्याने अनेकांना ई-पास काढता येत नाही. लहान मुलांना बाहेर ठेवल्याने अनेकवेळा मुलांची व पालकांची चुकामूक होते. मंदिरात एकच दरवाजा खुला केल्याने भाविकांची विनाकारण गर्दी होत आहे. यामुळे मंदिरातील चारही दरवाजे खुले करण्याची गरज आहे, असे मत यावेळी पुजार्‍यांनी मांडले. असे केल्यास मंदिर परिसरात भाविक थांबतील व दर्शन सुरळीत पार पडेल, असेही यावेळी सांगण्यात आले.

दर्शनासाठी लहान मुलांना वेगळी व्यवस्था नसल्याने अनेक महिला व त्यांच्या मुलांना रस्त्यावरच खाऊ घालणे, स्तनपान करावे लागते. मंदिरातील परिसर सध्या मोकळाच असतो. त्यामुळे ई-पास सहित लहान मुलांना मंदिरात प्रवेश मिळावा ही प्रमुख मागणी भाविक, ग्रामस्थांकडून व पुजारी वर्गाकडून झाली.

या नियमावलीत शिथिलता मिळावी यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे व आम्ही स्वतः प्रयत्न करू, असे जिल्हाधिकारी रेखावर यांनी सांगितले. यानंतर दर्शन मार्ग तसेच मंदिर परिसर पाहणी जिल्हाधिकारी रेखावार व जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी केली. बैठकीला शाहूवाडी डी. वाय. एस. पी. रवींद्र साळुंखे, शाहूवाडी प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, केदारर्लिंग देवस्थान समिती व्यवस्थापक दीपक म्हेतर, सरपंच राधाताई बुणे,कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक शीतलकुमार डोईजड, लोकप्रतिनिधी, मानाचे प्रतिनिधी, पुजारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

दर्शन वेळ पहाटे 4 ते रात्री 11

खेट्याच्या पाश्वर्र्भूमीवर जोतिबा दर्शन वेळेत बदल केला असून पहाटे 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. तसेच ई-पास प्रणालीत स्लॉट वाढवण्यात येणार आहे.

Back to top button