

हुपरी : पुढारी वृत्तसेवा
राजस्थानातील प्रसिध्द शहर अजमेर (राजस्थान) येथील शरीफ चौकात असणाऱ्या दुर्लक्षित झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या पाठपुराव्याला यश आले आहे. अजमेरमधील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची रंगकाम व उद्यानाचे सुशोभीकरण एका मुस्लिम शिवभक्ताच्या पाठपुराव्यामुळे झाले आहे. या घटनने सर्वधर्म समभावाचा परिपाठ आजच्या पिढीला मिळाला आहे.
हुपरीचे नगरसेवक अमजद नदाफ अजमेर (राजस्थान) येथे उद्यान पाहण्यासाठी गेले असता. त्यांच्या लक्षात आले की, हे उद्यान अत्यंत दुर्लक्षित झाले आहे. याठिकाणची झाडे-झुडपे वाढली होती. शिवाजी महाराजांच्या मुर्तीचा रंग पूर्ण गेला होता. येथील रहिवाशांशी चर्चा केल्यानंतर हें उद्यान अनेक वर्षे असेच आहे असे सांगण्यात आले. यावर नदाफ यांनी थेट मनपाच्या अधिकाऱ्यांचा फोन लावत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि अजमेर मनपाला पत्र लिहून याची गंभीरता लक्षात आणून दिली होती. तसेच, याबाबत निर्वाणीचा इशाराही दिला होता.
यावर मुखमंत्री कार्यालयाने अजमेर मनपाला तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे रंगकाम, आणि उद्यानांची सुशोभीकरण करण्याचे आदेश दिले होते. याची दखल घेत, अजमेर (राजस्थान) मनपाने छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे रंगकाम करून, उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आल्याचे फोटो नदाफ यांना पाठवले आहेत.
हे ही वाचा :